नाशिक : ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक, पत्रकार तथा नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘शोध’ या कादंबरीचे अभ्यासू लेखक मुरलीधर काळू खैरनार (५८) यांचे रविवारी येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी अॅड. मृणालिनी, कन्या अॅड. रुक्मिणी असा परिवार आहे. सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.नाट्य दिग्दर्शक, अभिनेते, माहितीपट निर्माते, लेखक, कवी, व्याख्याते असे त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. ३० वर्षांहून अधिक काळ त्यांनी नाट्य दिग्दर्शन केले. आवर्त, आणखी एक नारायण निकम, अजब न्याय वर्तुळाचा, राजाची गोष्ट, घालीन लोटांगण, शुभमंगल, चूकभूल द्यावी घ्यावी आदी नाटकांच्या दिग्दर्शनासह त्यांनी त्यात अभिनयही केला. त्यांच्या ‘गाढवाचं लग्न’ या नाटकाचे तीनशेहून अधिक प्रयोग झाले. काही काळ नाशिक व मुंबईत पत्रकारिता करणाऱ्या खैरनार यांनी शेतकरी संघटनेचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून काही वर्षे काम पाहिले. ‘शोध’चे यशछत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेहून लुटून आणलेल्या खजिन्याच्या ठावठिकाण्याची गोष्ट अत्यंत रंजकरीत्या उलगडणारी ‘शोध’ ही कादंबरी त्यांनी लिहिली. कुसुमाग्रज प्रतिष्ठानची एक लाखाची अभ्यासवृत्ती त्यांना या कादंबरीसाठी मिळाली होती. जुलै महिन्यात या कादंबरीचे प्रकाशन झाले होते.
नाट्य दिग्दर्शक मुरलीधर खैरनार यांचे निधन
By admin | Published: December 07, 2015 2:11 AM