गौरी टेंबकर - कलगुटकर, मुंबई- गोरेगावच्या इन आॅर्बिट मॉलमधील कॅफे कॉफी डे (सीसीडी) कॅश बॉक्समधून ३१ हजारांची रोकड लंपास करण्याचा प्रकार सोमवारी रात्री घडला. मात्र त्या वेळी वीजपुरवठा खंडित केल्याने सीसीटीव्ही फूटेजमध्ये काहीही आढळून आले नाही. मात्र बांगूरनगर पोलिसांनी शिताफीने तपास करीत त्या ठिकाणच्या माजी कर्मचारी अमीत अजुगया (वय ३२, रा मोतीलाल नगर, गोरेगाव पश्चिम) याला अटक केली. सत्तावीस फेब्रुवारीला रात्री साडे अकरा वाजता अजुगया याने सीसीडीच्या कॅश काउंटरमधून ३१ हजार ६५० रुपयांची रोकड घेऊन पळ काढला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी ‘सीसीडी’च्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याने दुकानातील सीसीटीव्ही तपासून पहिले. मात्र वीजपुरवठा खंडित केल्याने तेदेखील बंद झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने सर्व कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली. मात्र कोणीही कबुली न दिल्याने बांगुरनगर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. त्यांनी केलेल्या चौकशीत अमीत या ठिकाणी आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. सोमवारी रात्री तो सीसीडीच्या काउंटरवर गेला आणि त्याने तेथील वीजपुरवठा खंडित केला. सीसीटीव्ही पूर्णपणे बंद झाल्याची खात्री करीत त्याने गल्ल्यातील रोख रक्कम काढली आणि तो पसार झाला. त्याला १० दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. (प्रतिनिधी)
‘कॅफे कॉफी डे’मध्ये चोरी
By admin | Published: March 03, 2017 2:21 AM