ऑनलाइन लोकमतकोल्हापूर, दि. 29 - मध्यवर्ती बसस्थानक परिसरात रोज प्रवाशांचे ऐवज असलेली पर्स, बॅगा, पाकिटे चोरीचे प्रमाण वाढले आहे. शाहूपुरी पोलिसांच्या दुर्लक्षामुळे या परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. रविवारी भरदुपारी मुंबईच्या महिला प्रवाशाची पर्स चोरट्याने हातोहात लंपास केली. पर्समध्ये रोख 15 हजार रुपये, मतदान ओळखपत्र, एटीएम कार्ड होते. या वाढत्या चोरीमुळे प्रवासी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.अधिक माहिती अशी, शालिनी विजय सुरवाडे (वय 60, रा. कल्याण-मुंबई) या कुटुंबीयांसमवेत अंबाबाई दर्शनासाठी आल्या होत्या. दर्शन घेऊन दुपारी साडेतीनच्या सुमारास त्या मध्यवर्ती बसस्थानकावर आल्या. याठिकाणी कोल्हापूर-पुणे बसला प्रवाशांची गर्दी होती. बसमध्ये चढून वरती गेल्यानंतर त्यांच्या खांद्याला असणारी पर्स गायब असल्याचे दिसले. गर्दीमध्ये खाली पडली आहे का पाहिले असता मिळून आली नाही. पर्स चोरीला गेल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी शाहूपुरी पोलिसांत फिर्याद दिली.शनिवार (दि. 28) रोजी विजया राजेंद्र कोरडे (वय 53, रा. अष्टविनायक चौक, सांगलीवाडी) या मध्यवर्ती बसस्थानकासमोरील केएमटी बसथांब्यावरुन क्रांतीसिंह नाना पाटील नगरकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने त्यांच्या बॅगेतील पर्स काढून पलायन केले. दोन दिवसांपूर्वी मध्यवर्ती बसस्थानकात कोल्हापूर ते पुणे-स्वारगेट या बसमध्ये चढणाऱ्या कऱ्हाडच्या सुनीता सतीश पाटील (वय 53, रा. बुधवार पेठ, कऱ्हाड, जि. सातारा) या प्रवाशाची पर्स चोरट्याने हातोहात लंपास केली. महिन्यापूर्वी कऱ्हाड येथील प्राध्यापिका मेघा सुभाष कदम (वय 30, रा. खोडशी, ता. कऱ्हाड, जि. सातारा) या मैत्रिणीच्या लग्नासाठी कोल्हापुरात आल्या होत्या. लग्नकार्य आवरून मध्यवर्ती बसस्थानक येथे गगनबावडा-सातारा एस. टी. बसमध्ये चढताना त्यांचीही पर्स चोरट्याने लंपास केली होती. अशाच प्रकारे कोरडे यांचीही पर्स चोरीला गेली आहे. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात चोरीच्या घटना वारंवार घडूनही शाहूपुरी पोलीस दुर्लक्ष करीत आहेत. या चोरीच्या घटनामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोल्हापुरात चोरट्यांचा सुळसुळाट, शाहूपुरी पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष
By admin | Published: January 29, 2017 6:25 PM