ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 17 - दुचाकी चोरी प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या चेतन मनातकर याने १४ जानेवारी रोजी सायंकाळी पोलीस कोठडीत कीटकनाशक औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर सर्वोपचार रुग्णालयात तीन दिवसांपासून उपचार सुरू होते. अखेर मंगळवारी सकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेमुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दोषी असलेल्या एमआयडीसी ठाणेदारासह पोलीस कर्मचाºयांवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.
एमआयडीसी पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार लहान उमरीतील रॉबिन्सन बोर्डे आणि गोरक्षण रोडवर राहणारा चेतन मनातकर यांना १२ जानेवारी रोजी दुचाकी चोरीप्रकरणी अटक केली आणि त्यांच्याकडून चोरीच्या दहा मोटारसायकल जप्त केल्या.
पोलिसांनी दोघांनाही न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांनाही १७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी पंकज तायडे, रवी खंडारे आणि सलीम पठाण यांनी दोघांना १४ जानेवारी रोजी दुपारी सिव्हिल लाइन पोलीस ठाण्याच्या कोठडीमधून एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर काही वेळाने चेतन मनातकर हा आरोपी लघुशंकेसाठी ठाण्यातील स्वच्छतागृहात गेला. तिथे त्याला पिकांवर फवारणीसाठी वापरण्यात येणारे कीटकनाशक औषध दिसले. चेतनने क्षणाचाही विलंब न करता विषारी औषध प्राशन केले. विषारी औषध प्राशन केल्याने त्याची प्रकृती बिघडली. त्याने तिथेच उलट्या सुरू केल्या. हा प्रकार आरोपी रॉबिन्सन बोर्डे याला दिसताच त्याने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मनातकर याला तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. गत तीन दिवसांपासून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. चेतनचा मृत्यू झाल्याची वार्ता पोलीस कर्मचाºयांमध्ये पसरताच एकच खळबळ उडाली. रुग्णालयामध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांनी भेट दिली. (प्रतिनिधी)