सातारा- बंगल्यात चोरी करायला गेलेल्या चोरट्याचा त्याच ठिकाणी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ह्रदयविकाराचा झटका आलेल्या चोरट्याचा त्याच ठिकाणी मृत्यू झाल्यावर त्याचा मृतदेह सोडून त्याचे साथीदार पसार झाले. कऱ्हाडजवळच्या गजानन हाऊसिंग सोसायटीमध्ये घडलेली ही घटना मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कऱ्हाडजवळ असणाऱ्या गजानन हाऊसिंग सोसायटीमध्ये जयराम जोशी यांचा बंगला आहे. जोशी हे पॉलिश पेपरचे पश्चिम महाराष्ट्रातील मुख्य वितरक असून बंगल्यातच त्यांनी गोडाऊन व कार्यालय सुरू केलं आहे.
संबंधित बंगल्यात कोणीही वास्तव्यास नसतं. मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास जोशी नेहमीप्रमाणे बंगल्यात आले असता व्हरांड्यात कोणीतरी अस्ताव्यस्त पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता संबंधिताचा मृत्यू झाला असल्याचे त्यांना समजलं. त्यामुळे जोशी यांनी याबाबतची माहिती कऱ्हाड शहर पोलिसात दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता जोशी यांच्या बंगल्याचा मुख्य दरवाजा कटावणीने उचटकल्याचे दिसून आलं. तसंच पहिल्या मजल्यावरील कार्यालयाचा दरवाजाही कटावणीने उचकटण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून येत होते.
बंगल्याच्या पोर्चमध्ये मृतावस्थेत पडलेल्या व्यक्तीचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची शक्यता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. तसंच संबंधित व्यक्ती चोर असावी, असा पोलिसांचा कयास आहे. संबंधिताच्या खिशात कऱ्हाडातील एका थिएटरचे रात्रीच्या ‘शो’चे तिकीट आढळलं असून त्यावर तीन व्यक्तींसाठी असा उल्लेख आहे. त्यामुळे या चोरट्यासोबत अन्य दोघं असावेत, अशीही शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.