...तर १०-२० खासदार पडले असते; शिवतारेंचे बंड अचानक का थंड झाले? सांगितले कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2024 10:00 AM2024-03-31T10:00:34+5:302024-03-31T10:01:04+5:30
Vijay Shivtare on Baramati Election: विजय शिवतारे यांनी आता पलटी मारली असून ते बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार नाहीत. हे जाहीर झाल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पत्नी सुनेत्रा पवारांना उमेदवारी जाहीर केली आहे.
शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांविरोधात भुमिका घेऊन राज्यातील राजकीय वातावरण तापवून दिले होते. बारामतीतून सुनेत्रा पवारांना उमेदवारी मिळणार हे समजल्यावर त्यांनी बंड करत लोकसभेला उभे राहण्याची घोषणा केली होती. काहीही झाले तरी माघार नाही, अशा शब्दांत त्यांनी हे बंड केले होते. परंतु, अचानक महायुतीच्या तिन्ही नेत्यांना भेटत माघार घेतल्याने आता जनतेतून त्यांच्यावर टीका होत आहे.
विजय शिवतारे यांनी आता पलटी मारली असून ते बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार नाहीत. हे जाहीर झाल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पत्नी सुनेत्रा पवारांना उमेदवारी जाहीर केली आहे.
गेल्यावेळेला सुप्रिया सुळे यांना साडे पाच लाख मतदान विरोधात झाले होते. यामुळे शिवतारेंनी विधानसभेचा अपमान बाहेर काढत अजित पवारांना विरोध करत बारामतीच्या लोकांना संधी द्यायला हवी असे सांगितले होते. आता त्यांनीच सपशेल माघार घेतल्याने शिवतारेंना ट्रोल केले जात आहे.
यामुळे शिवतारेंनी अचानक भुमिका बदलल्यावरून स्पष्टीकरण दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मी न लढण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वी त्याआधी आमचे नेते खतगावकर यांचा फोन आला होता. त्यांनी समजावले की, तुमच्यामुळे मुख्यमंत्री अडचणीत येतील. अशा प्रकारे सर्वत्र अपक्ष उभे राहीले तर 10 ते 20 खासदार पडतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोठ्या विजयाने पुन्हा पंतप्रधान होण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही. यामुळे आपण न लढण्य़ाचा निर्णय घेतल्याचे शिवतारे म्हणाले.
तसेच तिन्ही नेत्यांच्या बैठकीत आपल्या मतदारसंघातील रखडलेल्या योजनांची माहिती दिली. या योजनांना चालना देण्याचे आश्वासन दिल्याने निवडणुकीतून माघार घेतल्याचे शिवतारे म्हणाले.