Jayant Patil ( Marathi News ) : महाराष्ट्रात मागील काही वर्षांत मोठी राजकीय स्थित्यंतरे झाली आहेत. राज्याने पाच वर्षांमध्ये तीन वेगवेगळे मुख्यमंत्री पाहिले. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी एकाच पंचवार्षिकमध्ये तीनदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचा विक्रम केला. मात्र अनेकदा उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळलेल्या अजित पवारांना अद्याप एकदाही राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होता आलं नाही. हीच सल त्यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात बोलून दाखवली होती. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे जुने सहकारी आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आता मुख्यमंत्रिपदाबाबत केलेल्या वक्तव्याची राजकीय वर्तुळाच चांगलीच चर्चा होत आहे.
अजित पवार महाविकास आघाडीसोबत असते तर ते मुख्यमंत्री झाले असते का? असा प्रश्न माढा दौऱ्यावर असताना जयंत पाटलांना विचारण्यात आला. त्यावर पाटील म्हणाले, "हो ते मुख्यमंत्री झाले असते. महाराष्ट्रात सध्या चांगलं वातावरण आहे. राज्यात महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल, असं चित्र आहे. त्यामुळे अजित पवार महाविकास आघाडीसोबत असते तर त्यांना सोईची परिस्थिती निर्माण झाली असती," असं मत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाबाबतही जयंत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी म्हटलं की, "मराठा आरक्षणाबाबत आम्ही आमची भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली आहे. त्यानंतर सरकारनेही दोन्ही बाजूच्या लोकांशी चर्चा केली. मात्र या आंदोलकांना नेमकं काय आश्वासन दिलं, हे सरकार सांगत नाही. त्यामुळे सरकारने आता निर्णय घ्यावा, अशी आमची अपेक्षा आहे," अशी भूमिका जयंत पाटलांनी मांडली आहे.
मुख्यमंत्रिपदाबाबत अजित पवार काय म्हणाले होते?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनावर आधारित 'योद्धा कर्मयोगी' या पुस्तकाचं प्रकाशन काही दिवसांपूर्वी राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत फटकेबाजी करत देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून म्हटलं होतं की, "जेव्हा तुम्ही एकनाथ शिंदे यांना सांगितलं की इतके इतके आमदार आणल्यानंतर मुख्यमंत्री करतो, तेव्हा मलाच सांगितलं असतं तर मी अख्खा पक्षच घेऊन आलो असतो. जाऊद्या आता काय...शेवटी हा नशिबाचा भाग असतो. देवेंद्र फडणवीस यांची आमदार म्हणून टर्म १९९९ ला सुरू झाली, तर एकनाथ शिंदे यांची २००० ला सुरुवात झाली. यांच्यात सर्वांत सिनियर मी आहे, माझी सुरुवात १९९० मध्ये झाली. तरी मी मागे राहिलो, मला जर संधी दिली असती तर मी पूर्ण पार्टी आणली असती. त्यांनी तर फक्त आमदारच आणले," असं पवार यांनी म्हटलं होतं.