पंढरपूर (जि. सोलापूर) : महाराष्ट्रातील फडणवीस सरकार हे मोदींच्या कृपेमुळे सत्तेत आले नाही. ते कोणाच्या कृपेमुळे आले हे तुम्हाला माहीत आहे, आमचे सरकार पाडले नसते तर राज्यात सत्तांतरच झाले नसते, अशी खंत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. त्यांच्या टीकेचा रोष शरद पवार यांच्याकडे असला तरी त्यांचे थेट नाव न घेता चव्हाणांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला. आता पुन्हा सत्तेत यायचे असेल तर देशाचे राजकारण करणाऱ्या नेत्यांनी परिपक्वता दाखविल्यास आघाडी होऊ शकते, असेही ते म्हणाले.पत्रकार परिषदेत चव्हाण म्हणाले, केंद्र आणि राज्यातील कारभारावर लोक प्रचंड नाराज आहेत. काल जाहीर झालेल्या एका सर्वेक्षणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामावर नाराज असलेल्या लोकांची संख्या ही ७५ टक्के इतकी आहे. २०१४ च्या निवडणुकीत ३१ टक्के लोकांनी भाजपाला मतदान केले होते, तर त्यांच्या विरोधात ६९ टक्के लोकांनी मतदान केले होते. या सरकारचा कारभार पाहता नकारात्मक मतदानात वाढ होते आहे.केंद्र शासनाचे आयात निर्यात धोरण चुकल्याने त्याचे दूरगामी परिणाम कृषी अर्थ व्यवस्थेला भोगावे लागत आहेत. देशातील साखरेचे उत्पादन लक्षात न घेता केंद्र शासनाने ९ लाख टन साखर आयात केली. त्यामुळे देशातील साखरेचे दर कोसळले. सरकार चालविण्याचा अनुभव नसल्याने साखर कारखाने आणि ऊस उत्पादक शेतकरी या निर्णयामुळे अडचणीत आला. आता ७५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. हे अनुदान तुटपुंजे आहे. या तात्पुरत्या मलमपट्टीने काहीही होणार नाही, यासाठी काही धोरणात्मक निर्णय सरकारला घ्यावा लागेल, असेही चव्हाण म्हणाले.
नेत्यांनी परिपक्वता दाखविल्यास आघाडी शक्य - पृथ्वीराज चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 5:43 AM