‘तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनीच यूपीएला दोनदा पाठिंबा दिला होता’, काँग्रेसचा भाजपाला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 06:51 PM2024-03-18T18:51:09+5:302024-03-18T18:52:24+5:30
Balasaheb Thackeray News: बाळासाहेब ठाकरे व काँग्रेसच संबंध लपून राहिलेले नाहीत. बाळासाहेबांनीच काँग्रेसप्रणित यूपीए सरकारच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार प्रतिभाताई पाटील व प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता, याची माहिती कदाचित या लोकांना नसावी किंवा त्यांना विसरण्याचा रोग जडला असावा त्यामुळे या मंडळींनी उगाच बोंबाबोंब करू नये.
मुंबई - शिवाजी पार्कवरील भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाच्या ऐतिहासिक सभेने एक नवा इतिहास रचला आहे. शिवाजी पार्कवरील सभेने भाजपाला आपला पराभव समोर दिसू लागला आहे त्यामुळे नैराश्येतून चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दरेकर यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धडकी भरली आहे. या सभेने ‘मोदानी’ सरकारच्या अंताची सुरुवात झाल्याने, त्यांची झोप उडाली आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व काँग्रेसच संबंध लपून राहिलेले नाहीत. बाळासाहेबांनीच काँग्रेसप्रणित यूपीए सरकारच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार प्रतिभाताई पाटील व प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता, याची आठवणही नाना पटोले यांनी करून दिली.
काँग्रेसबाबत बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेवरून टीका करणाऱ्या भाजपाला टोला लगावताना नाना पटोले यांनी सांगितले की, भाजपाने देशभरातील विविध राज्यात राजकीय तडजोडी केल्या, काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्या पक्षासोबत सरकार स्थापन करून भाजपाने दीड दोन वर्ष संसार केला तेंव्हा यांचे ‘हिंदुत्व खतरे में’ आले नाही का? बाळासाहेबांचा एखादा व्हिडिओ दाखवून ते काँग्रेस विरोधी होते हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व काँग्रेसच संबंध लपून राहिलेले नाहीत. बाळासाहेबांनीच काँग्रेसप्रणित यूपीए सरकारच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार प्रतिभाताई पाटील व प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता, याची माहिती कदाचित या लोकांना नसावी किंवा त्यांना विसरण्याचा रोग जडला असावा त्यामुळे या मंडळींनी उगाच बोंबाबोंब करू नये, असा टोला नाना पटोले यांनी लगावला.
शिवाजी पार्कवरील सभा आणि राहुल गांधी यांच्यावर टीका करणाऱ्यांचा खरपूस समाचार घेत नाना पटोले पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी सर्वात मोठे खंडणी वसुलीचे रॅकेट चालवतात या राहुल गांधी यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याची धमक आधी भाजपाने दाखवावी. शिवाजी पार्कवरील सभेने देशात परिवर्तनाचा संकेत दिला आहे हे स्पष्ट असून पराभवाच्या भितीपोटी भाजपा व गद्दारसेनेचे लाचार या सभेवर अनावश्यक टीका करत आहेत. उद्धव ठाकरेंनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सरकार स्थापन केल्यापासून भाजपाला पोटशूळ उठला आहे. ‘हिंदुत्व खतरे में’ अशी कोल्हेकुई भाजपाचे नेते करत असतात व त्यांच्याच सुरात सुर मिसळून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे री ओढत असतात, अशी टीकाही त्यांनी केली.
काँग्रेस पक्षाने ५ न्यायासह २५ गॅरंटी दिल्या आहेत, सर्व समाज घटकांना न्याय देण्याचा या गॅरंटीतून प्रयत्न केला जाणार आहे. ही काँग्रेस पक्षाची गॅरंटी आहे, कोणत्या एका व्यक्तीची नाही, मोदींसारखी फेकूगिरी व जुमेलबाजी तर नक्कीच नाही. बावनकुळेंची पात्रता असेल तर त्यांनी नक्कीच या गॅरंटींचा अभ्यास करावा. मागील १० वर्षात भाजपा व मोदींनी काय दिवे लावलेत ते भाजपाच्या नेत्यांना व त्यांच्या विकास रथांना गावागातून लोक हुसकावून लावत आहे, यावरून दिसतेच आहे, असा टोला नाना पटोले यांनी लगावला.