लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पाणी कपातीविषयी आढावा घेऊन निर्णय घेऊ असे सूतोवाच महापौर नितीन काळजे यांनी केल्यानंतर पाणीकपात प्रशासन मागे घेणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मॉन्सूनचे आगमन न झाल्याने सावध भूमिका सत्ताधाऱ्यांनी घेतली आहे. समाधानकारक पाऊस पडल्यानंतर नियमितपणे कपात मागे घेऊ असे धोरण सत्ताधारी आणि प्रशासनाने अवलंबविण्याचे ठरविले आहे. तूर्तास पाणी कपात मागे घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.महापालिकेने २ मेपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. पाणीकपात मागे घेतली आणि पाऊस वेळेवर पडला नाही, तर नियोजन कोसळेल. त्यामुळे पाणीकपात मागे घेणार नाही, दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे महापौर नितीन काळजे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. सध्या धरणात २५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणीकपात केल्याचे प्रशासनाने सांगितले होते. दरम्यान पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळेच पाणी टंचाई झाल्याचे लोकप्रतिनिधींनी उघड केले होते. याबाबत महापौरांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टीही काढली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, मनसेच्या नगरसेवकांनी टँकर लॉबीसाठी पाणीटंचाई केली जात असल्याचा आरोप केला होता. खासदार श्रीरंग बारणे, शहरप्रमुख राहुल कलाटे, माजी गटनेत्या सुलभा उबाळे, माजी नगरसेवक मारुती भापकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम यांनी पाणीटंचाई विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र, पालिका पदाधिकारी, पाणीपुरवठा व जलसंपदा अधिकाऱ्यांची बैठक अद्याप झालेली नाही.मॉन्सून लांबल्यास अडचणजुलैअखेरपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा असला, तरी पाणीकपात मागे घेतली, तर पाऊस न पडल्यास अडचण निर्माण होऊ शकते. मॉन्सूनचे आगमन हे बेभरवशाचे असते. एक जूनपर्यंत येणारा मॉन्सून सहा तारखेपर्यंतही आलेला नाही. त्यामुळे कपात मागे घेऊन संकट ओढवून घेण्यासारखे आहे. त्यामुळे पाणीकपात मागे घेणे धोक्याचे राहील, असे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे.
...तर पाणीकपात मागे
By admin | Published: June 07, 2017 1:47 AM