ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 8 - शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत राज्य सरकार संवेदनाहीन झाले आहे. शेतकऱ्याचा आक्रोश त्यांच्या कानात जात नाही आहे. त्यामुळे या बहिऱ्या सरकारच्या कानापर्यंत शेतकऱ्यांचा आक्रोश पोहोचावा म्हणून आम्ही भगतसिंगाप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या घरावर बॉम्ब टाकू असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे.
सरकारने येत्या 48 तासांत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढावा, अन्यथा आम्ही आक्रमक होऊ असा इशारा कडू यांनी राज्य सरकारला दिला. त्यावेळी आक्रमक झालेले कडू म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बहिऱ्या सरकारला जागे करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आम्ही भगत सिंगाप्रमाणे आक्रमक होऊ, वेळ पडल्यास सरकारला जागे करण्यासाठी भगत सिंगने जसा विधिमंडळात बॉम्ब टाकला होता, तसा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यासमोर बॉम्ब फोडू," एबीपी माझा या वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना बच्चू कडू यांनी हे वक्तव्य केले.
दरम्यान, सरकारनं 2 दिवसांत मागण्या मान्य कराव्यात, मागण्या मान्य न केल्यास 13 जूनपासून निर्णायक लढा देण्यात येईल, असा इशारा आज नाशिक येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीच्या बैठकीत देण्यात आला. शेतकरी संपाची पुढील दिशा ठरवण्यासाठी नाशिक येथे बैठक घेण्यात आली होती.