राजा माने, सोलापूरनिवडणुकीचा हंगाम उमेदवारांना काहीही करायला भाग पाडतो. विनयशीलता असो वा नसो त्यांना मतदारांचे पायही धरावे लागतात. सध्या राज्यात सुरू असलेल्या निवडणुकीतही तसाच अनुभव देणाऱ्या वेगवेगळ्या घटना-किश्शांचा आनंद मतदार लुटत आहेत. राज्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची सुरुवातीला वाटणारी लुटुपुटूची लढाई आता चक्क खऱ्या लढाईत रूपांतरित झाली आहे. देवेंद्र विरुद्ध उद्धव वाक्युद्धाला दररोज नवे रंग मिळू लागले आहेत. त्या रंगांची उधळण भाजप आणि शिवसेनेची दुसऱ्या फळीतील नेतेमंडळी राज्यभरातील आपल्या प्रचार दौऱ्यात इमानेइतबारे करीत आहेत. भाजपच्या ‘मिशन इनकमिंगला’ सोलापूर जिल्ह्यात नवा रंग देणारा देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील, सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख ‘मिशन हायजॅक’चा यशस्वी प्रयोग प्रत्येक तालुक्यात सुरू केला आहे. त्याच प्रयोगाच्या मांडणीसाठी खुद्द फडणवीस यांनी जिल्ह्यातील बार्शी व माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे सभा घेतल्या. मुंबई महापालिकेच्या निवडणूक युद्धातील डावपेचात मुंबई नगरीत शिवसेनेचे मंत्री खिशात मंत्रिपदाचे राजीनामे घेऊन फिरत असताना मुख्यमंत्री आणि त्यांचे शिलेदार इकडे सोलापूर जिल्ह्यात ‘मिशन हायजॅक’ राबवित होते. बार्शीच्या मोहिमेतील सभा आटोपून मुख्यमंत्री पुण्याकडे रवाना झाले आणि चंद्रकांतदादा पाटील यांनी यशाचा आणखी एक मार्ग धुंडाळायचा निर्णय घेतला. श्री भगवंतांचे एकमेव मंदिर बार्शीत आहे. दादा त्या मंदिरात गेले आणि अगदी मोठ्या आवाजात हाक देत म्हणाले, ‘हे भगवंता... मुंबई महापालिकेची सत्ता भाजपला मिळू दे. मुख्यमंत्र्यांना मी तुझ्या दारी आणेन !’ त्यानंतर त्यांनी श्रद्धेने चक्क साष्टांग दंडवतच बार्शीच्या ग्रामदैवत भगवंतांपुढे घातला. त्यांनी भगवंताला घातलेल्या या साकड्याचे साक्षीदार होते सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या ‘मिशन हायजॅक’चे एक शिलेदार माजी आमदार राजेंद्र राऊत तसेच बार्शीचे नगराध्यक्ष असिफ तांबोळी, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, केशव घोगरे, विजय राऊत आणि तिथे जमलेले भक्तगण.
...तर मुख्यमंत्र्यांना तुझ्या दारी आणेन!
By admin | Published: February 11, 2017 1:53 AM