ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 8 - चंद्रकांत पाटलांनी शेतक-यांची कर्जमाफी करून दाखवल्यास आम्ही त्यांना मुख्यमंत्री करू, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले आहेत. ते विधानसभेत बोलत होते. चंद्रकांत पाटील तुम्ही नंबर दोनचे नेते आहात. कर्जमाफीची घोषणा करून पदाला साजेशी कामगिरी करा, आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ, तसेच तुम्हाला मुख्यमंत्रिपदीसुद्धा बसवू, असं अजित पवार चंद्रकांत पाटलांना उद्देशून म्हणाले आहेत. विधानसभेत आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार चांगले आक्रमक झाले होते. शेतक-यांच्या कर्जमाफीवरून त्यांनी युती सरकारला धारेवर धरलं आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीत निवडून आल्यावर कर्जमाफी करू, अशी घोषणा करता मग महाराष्ट्रातील शेतक-यांना का कर्जमाफी देत नाही, तशी घोषणा का करत नाही, असा प्रश्न उपस्थित करत अजित पवारांनी भाजपा सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. विजय मल्ल्या 9 हजार कोटी बुडवून इंग्लंडला पसार झाला, पण सरकारला आमचा शेतकरी बंधू दिसत नाही का, अशा शब्दात अजित पवारांनी फडणवीस सरकारवर ताशेरे ओढले. फडणवीस म्हणतात, योग्य वेळी कर्जमाफी करून दाखवू, मग सगळे शेतकरी आत्महत्या कधी करत आहेत, याची सरकार वाटत पाहत आहे का?, सर्व शेतक-यांनी आत्महत्या केल्यानंतर कर्जमाफीची घोषणा करणार का, असं म्हणत अजित पवारांनी भाजपा सरकारवर आगपाखड केली.(मुंबई पालिकेतल्या भ्रष्टाचाराची 'एसआयटी'मार्फत चौकशी करा- भाजपा)तसेच यावेळी महापालिकेत झालेल्या रस्ते घोटाळ्याची चौकशी एसआयटीमार्फत करण्याची मागणी करीत भाजपाने आज शिवसेनेवर हल्लाबोल करण्याचा प्रयत्न केला. या मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधकांनीही पाठिंबा दर्शवला आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीचा फायदा घेत स्वपक्षीय सदस्यच आयुक्तांची कोंडी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे लक्षात येताच नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी ही मागणी फेटाळून लावली.
...तर चंद्रकांत पाटलांना मुख्यमंत्री करू- अजित पवार
By admin | Published: March 08, 2017 9:16 PM