अमरावती - गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाडा आणि विदर्भात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, मराठवाडा आणि विदर्भात निर्माण झालेल्या पुरस्थितीची आणि शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीबाहेर पडून करावी, अशी मागणी खासदार नवनीत कौर-राणा यांनी केली आहे. तसेच जर राज्यातील शेतकऱ्यांची दिवाळी सुखात गेली नाही तर मुख्यमंत्र्यांची दिवाळीही आम्ही सुखाने जाऊ देणार नाही, असा इशारा नवनीत कौर राणा यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
विदर्भ-मराठवाड्यातील पूरपरिस्थितीबाबत नवनीत कौर-राणा म्हणाल्या की, गेल्या दोन तीन दिवसांपासून मराठवाडा आणि विदर्भामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे मराठवाडा आणि विदर्भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीही उत्पन्न येणार नाही. काही लोकांची घरे तर काही लोकांची दुकाने पाण्यात वाहून गेली आहेत. आज महाराष्ट्रातील या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ आणि मदतीच्या हाताची गरज आहे. मात्र मुख्यमंत्री मातोश्रीमध्ये मस्त बसले आहेत, तर राज्यातील शेतकरी आणि जनता त्रस्त आहे.
मी मुख्यमंत्र्यांना आवाहन करते की, येणाऱ्या दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर ३० हजार रुपये मदत मिळाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांना एवढीच विनंती करते की, मुख्यमंत्र्यांनी आतातरी मातोश्रीबाहेर पडावे आणि शेतात जाऊन शेतकऱ्यांची विचारपूस करावी. त्यांच्या अडचणी ऐकून घ्याव्यात. त्यांना काय मदत करायची याचा निर्णय घ्या. आज मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीमध्ये आराम करण्याऐवजी शेतकऱ्यांसोबत असले पाहिजे. महाराष्ट्रातील शेतकरी आज खूप संकटात आहेत, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडून शेतकऱ्यांना साथ दिली पाहिजे. जर राज्यातील शेतकऱ्यांची दिवाळी सुखात गेली नाही तर मुख्यमंत्र्यांची दिवाळीही आम्ही सुखाने जाऊ देणार नाही, असा इशारा नवनीत कौर राणा यांनी दिला.