पुणे: केंद्र सरकारने आणलेले कृषी विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचे, त्यांना त्यांच्या मालाचा दर ठरवण्याचे स्वातंत्र्य देणारे आहे. काँग्रेस त्याला विरोध करत असेल तर हा पक्ष शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याच्या विरोधात आहे असे दिसते. त्यांच्या कृषी विधेयकाला विरोध करण्याच्या भूमिकेमुळे 'काँग्रेस का हात दलालोंके साथ' असेच म्हणावे लागेल, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली.
कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ उपाध्ये यांंनी माध्यम प्रतिनिधींबरोबर संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. उपाध्ये म्हणाले, काँग्रेस या विधेयकाच्या विरोधात अपप्रचार करत आहे. ते सत्तेवर होते त्यावेळी त्यांनी कधीही शेतकऱ्यांना नडणारी आडते, दलाल ही व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न केला नाही. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी त्यांनी लागू केल्या नाहीत, त्या भाजपाने केल्या. शेतकऱ्याला त्याच्या मालाचा दर ठरवण्याचा अधिकार हवा, तो कुठे, कोणाला, कसा विकायचा याची मुभा त्याला हवी. केंद्र सरकारने मंजूर केलेली तिन्ही विधेयके हेच करणारी आहेत असा दावा उपाध्ये यांंनी केला.
काँग्रेसच्या विधेयकाला विरोध करण्याच्या भूमिकेमुळे काँग्रेस का हात दलालोंके साथ असेच दिसत असल्याचे उपाध्ये म्हणाले. बाजार समित्या, आडते, दलाल यांच्याबद्दल त्यांंना प्रेम का वाटते याचे उत्तर त्यांनी द्यावे. हा निर्णय एकदम घेतलेला नाही. या निर्णयामुळे बाजार समित्या बरखास्त होणार नाहीत, तर त्यांना आता स्पर्धा करावी लागणार आहे. पंजाबमधून विरोध होत आहे, पण तिथेही विधेयक समजून घेतले नाही हेच कारण आहे. भाजपाने निवडणुकीत शेतकरी हिताचे निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. केंद्र सरकार ते पाळत आहे, काँग्रेस मात्र त्यांनी निवडणूक जाहिरनाम्यात दिलेल्या आश्वासनांना हरताळ.फासत आहे असे उपाध्ये म्हणाले. शहर भाजपाचे सरचिटणीस नगरसेवक राजेश येनपुरे, कोषाध्यक्ष विनायक आंबेकर यावेळी उपस्थित होते.