"…तर काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ शकतो", बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 10:22 PM2024-07-19T22:22:29+5:302024-07-19T22:33:43+5:30
Balasaheb Thorat : महाराष्ट्रात महायुती सरकारचा भ्रष्टाचार मंत्रालयापासून खालीपर्यंत बिनधास्त सुरु आहे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.
मुंबई : विधानसभा निवडणुक एकजूटीने लढलो, तर मविआ 180 जागा जिंकू शकते आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ शकतो, असा विश्वास काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल व प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, खासदार व आमदारांची बैठक टिळक भवन येथे संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, लोकसभेची निवडणूक काँग्रेस पक्षाला मोठ्या संकटात लढावी लागली, पक्षाची सर्व बँक खाती गोठवली, काही नेत्यांवर कारवाया केल्या, काहींना अटक केली, अशा बिकट परिस्थितीत लोकसभा निवडणूक लढवली पण जनतेचा प्रतिसाद काँग्रेस इंडिया आघाडीला मिळाला तसेच राहुल गांधी यांच्या संघर्षालाही जनतेने साथ दिली. महाराष्ट्रात महायुती सरकारचा भ्रष्टाचार मंत्रालयापासून खालीपर्यंत बिनधास्त सुरु आहे. महागाई, बरोजगारीचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे हाल होत आहेत, युवकांचे प्रश्न आहेत, हे सर्व जनतेपर्यंत घेऊन जायचे आहे. विधानसभा निवडणुक एकजूटीने लढलो तर मविआ 180 जागा जिंकू शकते आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ शकतो, असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
के. सी. वेणुगोपाल म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने 237 जागा जिंकून भाजपाला रोखले आहे. आजही देशातील वातावरण इंडिया आघाडीचेच असून महाराष्ट्रात काँग्रेस व मविआसाठी चांगले वातावरण आहे. काँग्रेस पक्ष सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे तर भाजपा मात्र धनदांडग्यांबरोबर आहे हे स्पष्ट झाले आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुक होत आहे. ही विधानसभा निवडणूक जिंकणे हेच काँग्रेस मविआसाठीचे लक्ष्य आहे आणि ही निवडणूक जिंकावीच लागेल. यासाठी सर्वांनी एकजुटीने मतभेद विसरून जातीय धर्मांध शक्तींना पराभूत करायचे आहे. भाजपाच्या राज्यात सर्वसामान्य माणूस, शेतकरी, महिला, तरुण, विद्यार्थी, दलित, अल्पसंख्यांक आदिवासी कोणीही सुखी आणि सुरक्षित नाही. जनतेचे हित जोपासण्यासाठी भाजपाला सत्तेतून खाली खेचलेच पाहिजे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी प्रदेश काँग्रेसची महत्वाची बैठक अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल व प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत आज टिळक भवन येथे पार पडली. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी… pic.twitter.com/CtbkfrDQLB
— Balasaheb Thorat (@bb_thorat) July 19, 2024
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी संघटनात्मक कार्यक्रमांची रुपरेषा आखलेली आहे. 23 जुलै रोजी जिल्हा कमिटींच्या बैठकांचे आयोजन केले आहे. 25 ते 30 जुलै ब्लॉक मिटिंग होतील, तर 1 ते 10 ऑगस्ट दरम्यान बुथ लेवलच्या बैठका आयोजित करून संघटन मजबूत करण्यावर भर द्यायचा आहे. लोकसभेला जसे नवे चेहरे दिले तसेच विधानसभेलाही नवीन चेहरे दिले जातील, महिलांनाही संधी दिली जाईल. स्व. पंतप्रधान राजीव गांधी यांची 20 ऑगस्ट रोजी जयंती आहे. या दिवशी काँग्रेस अध्यक्ष मलिकार्जून खर्गे व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत भव्य सभा आयोजित करण्यात आली असून या सभेतच विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला जाईल, असेही चेन्नीथला म्हणाले.
याचबरोबर, नाना पटोले म्हणाले की, महाभ्रष्ट महायुती सरकारने राज्याला आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर नेऊन उभे केले आहे. राजकीय फायद्यासाठी राज्यातील सामाजिक सलोखा बिघडवला आहे. महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पाठवले. शेतकरी संकटात आहे. 20 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकार शेतकऱ्यांचे कर्जमाफ करत नाही, पण उद्योगपती अनील अंबानी यांचे 1700 कोटी रुपयांचे कर्ज माफ करते. उत्तर प्रदेश नंतर सर्वात जास्त बेरोजगारी महाराष्ट्रात आहे. कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली आहे. महायुती सरकारने महाराष्ट्राची अधोगती केली आहे. महाराष्ट्राला पुन्हा गतवैभव मिळवून द्यायचे असेल तर हे असंवैधानिक सरकार पायऊतार करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही त्यामुळेच काँग्रेसने देशाचे संविधान आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान रक्षणाचा संकल्प केला आहे.