‘...तर काँग्रेस दोन-चार नेत्यांचाच पक्ष राहील’, चव्हाणांना उशिरा शहाणपण सुचले', विखे-पाटलांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 10:25 AM2022-08-28T10:25:21+5:302022-08-28T10:25:55+5:30
ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्षाचा दिलेला राजीनामा ही पक्षांतर्गत बाब असली तरी त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर काँग्रेस नेतृत्वाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. अन्यथा हा पक्ष चार-दोन नेत्यांचाच राहील, असे मत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केले.
शिर्डी : ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्षाचा दिलेला राजीनामा ही पक्षांतर्गत बाब असली तरी त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर काँग्रेस नेतृत्वाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. अन्यथा हा पक्ष चार-दोन नेत्यांचाच राहील, असे मत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केले.
काँग्रेस पक्षात लोकशाहीसाठी यापूर्वी पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे-पाटील यांनीही संघर्ष केला होता. मात्र, त्यांनाही त्याची किंमत चुकवावी लागली होती. याची आठवणही त्यांनी पत्रकारांशी बोलताना करून दिली.
शिर्डी येथे पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री विखे म्हणाले की, मी जेव्हा काँग्रेस पक्ष सोडला, त्यावेळीही अशीच परिस्थिती होती. यामध्ये बदल न झाल्यामुळेच पक्षाचे असंख्य नेते आता बाहेर पडत आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलेले मत म्हणजे त्यांना उशिरा सुचलेले शहाणपण आहे.
आता उरलेले आमदार तरी सांभाळा
शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांच्या झालेल्या युतीबाबत विखे म्हणाले, शिवसेनेने कोणाबरोबर युती करावी, हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे; परंतु आता जनाधार गमावलेल्यांना कोणाचा तरी आधार शोधण्याची वेळ आली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी केलेली युती मान्य नसल्यामुळे चाळीस आमदार तुमच्यापासून दूर गेले. नव्या युतीमुळे उर्वरित आमदार तरी तुमच्या जवळ राहतील का?, याचे आत्मपरीक्षण उद्धव ठाकरे यांनी करावे, असे विखे म्हणाले.