लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ३१ आॅक्टोबरपूर्वी राज्यातील शेतक-यांना कर्जमाफी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यादृष्टीने वित्तविभागाने तयारी केली आहे. मात्र, सरसकट कर्जमाफीची मागणी चुकीची असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मीही शेतकरी आहे. आमची शेती आहे. मग, अशा शेतक-यांनाही कर्जमाफी द्यायची का, असा सवाल करतानाच अडचणीत सापडलेल्यांनाच कर्जमाफी दिली जाईल, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. शेतीबाबत मागील सरकारच्या उदासीन भूमिकेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. हा संप सरकारविरोधात नाही. त्यामुळे सरकार शेतकरी संपाकडे सकारात्मक नजरेतून पाहत आहे, असे मुनगंटीवार म्हणाले. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करायचेच आहे. त्यांच्या सर्व समस्या मार्गी लावायच्या आहेत. त्यांना चांगले आयुष्य द्यायचे आहे. मात्र त्याआधी छोट्या-छोट्या सुविधा पुरवण्यावर सरकार भर देत आहे. त्यांचे प्रश्न व्यवस्थितपणे समजून घेतले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या शेतीपूरक योजनांना प्रोत्साहन दिले जात आहे, अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली.>‘मुख्यमंत्री एकाकी नाहीत’ शेतकरी संपादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस एकटे पडले आहेत. त्यांना कोणत्याच मंत्र्याची साथ मिळत नाही, असे बोलले जात होते, मात्र ही निव्वळ अफवा आहे. मुख्यमंत्री जेव्हा निर्णय घेतात तेव्हा ते सर्व मंत्र्यांशी चर्चा करतात. सर्वच मंत्री त्यांच्या पाठिशी आहेत, असे मुनगंटीवार म्हणाले. मध्यावधी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून कर्जमाफीसाठी आॅक्टोबरचा मुहूर्त निवडला का असे विचारले असता, १९९९ साली मध्यावधी निवडणुका घेण्याचा प्रयोग अंगलट आला होता. त्यामुळे मध्यावधी निवडणुकांचा गप्पांना अर्थ नसल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
मग, शरद पवारांनाही कर्जमाफी द्यायची का?
By admin | Published: June 07, 2017 5:49 AM