Ramdas Athawale News: संविधान तयार करण्यात सर्वांचे योगदान होते. मात्र, पंडित जवाहरलाल नेहरू आणि राजेंद्र प्रसाद यांनी स्वतः म्हटले आहे की, तुम्ही संविधानाचे शिल्पकार आहात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जर अजून १० ते १५ वर्ष असते, तर ते पंतप्रधान झाले असते, असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
पत्रकारांशी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, जम्मू काश्मीरमध्ये ९९ टक्के दहशतवादी हल्ले कमी झाले, त्यामुळे सद्यस्थितीत खूप शांतता आहे. काँग्रेसच्या काळात ३७० कलम हटवले असते तर अजून जम्मू काश्मीरमध्ये जास्त विकास झाला असता. केंद्र सरकारने वक्फ विधेयकात केलेले बदल हे मुस्लिम विरोधी नाही. तर मुस्लिमांना सधन करण्यासाठी आहे. मात्र विरोधकांकडून सातत्याने यासंदर्भात मुस्लिम समाजात गैरसमज निर्माण केले जात असून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सुरू आहे, अशी टीका रामदास आठवले यांनी केली.
२०२९ मध्येही नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील
पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधानात बदल करणारे नाहीत. पंतप्रधान मोदी सक्षम आहेत. राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते असले तरी ते अनावश्यक ठिकाणी मुद्दे उपस्थित करून काँग्रेसची प्रतिमा खराब करण्याचे काम करत आहेत. राहुल गांधी आहेत, तोपर्यंत आम्हाला चिंता नाही. कारण २०२९ मध्येही एनडीएचे सरकार येणार आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार आहेत आणि मीही मंत्री होईन, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
दरम्यान, लाडकी बहीण योजनेचे २१०० रुपये आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन आम्ही पूर्ण करणार आहोत. आत्ता परिस्थिती नसली तरी भविष्यात आश्वासनांची पूर्तता केली जाईल, अशी ग्वाही रामदास आठवले यांनी दिली. तसेच औरंगजेब कबरीचा वाद हा छावा चित्रपट पहिल्यानंतर वाद समोर आला. सर्व धर्मांमध्ये बंधू भाव वाढविण्यासाठी संविधान आहे. आणि हा वाद जास्त वाढू नये, असे माझे मत आहे, असे रामदास आठवले यांनी सांगितले.