नाशिक : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूबाबतचे पूर्ण सत्य समोर आले, तर गरज वाटल्यास ‘महानायक’ या नेताजींच्या आयुष्यावरील कादंबरीचा शेवट बदलावा लागेल, असे या कादंबरीचे लेखक विश्वास पाटील यांनी स्पष्ट केले. एका कार्यक्रमानिमित्त नाशिकला आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गेल्या काही दिवसांपासून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या गूढ मृत्यूवरून देशात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. त्यातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नेताजींशी संबंधित ६४ गोपनीय फाइल्स खुल्या केल्याने तिला आणखी जोर आला आहे. १८ आॅगस्ट १९४५ रोजी एका विमान अपघातात नेताजींचा मृत्यू झाल्याचे आजवर मानले जात होते; मात्र हा मुद्दा नेहमीच वादग्रस्त राहिला होता. नेताजींनी शत्रूला हुलकावणी देण्यासाठी तेव्हा स्वत:च्या मृत्यूची आवई उठवल्याचे अनेकांचे मत होते. ममता बॅनर्जी यांनी नुकत्याच खुल्या केलेल्या फाइल्समधूनही नेताजी सन १९४५ नंतरही जिवंत असल्याचे पुरावे समोर येत आहेत. लेखक विश्वास पाटील यांनी सुमारे आठ ते नऊ वर्षे सखोल संशोधन करून तेरा वर्षांपूर्वी नेताजी सुभाषबाबूंच्या संघर्षमय आयुष्यावर ‘महानायक’ ही कादंबरी लिहिली असून, ती बरीच गाजली आहे. नेताजींचा मृत्यू त्या विमान अपघातातच झाल्याचे शिक्कामोर्तब पाटील यांनी आपल्या कादंबरीतून केले होते. नेताजींचा मृत्यू नेमका कसा झाला, याचे अत्यंत तपशीलवार विवेचन त्यांनी ‘महानायक’मध्ये केले आहे; मात्र सध्या सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनीदेखील नेताजींच्या मृत्यूचे गूढ वाढत असल्याचे विधान केले होते. यासंदर्भात त्यांना विचारले असता ते म्हणाले, ‘सुभाषबाबूंविषयी गोपनीय माहिती असलेल्या ६४ फाइल्स ममता बॅनर्जी यांनी खुल्या केल्या असल्या, तरी अद्याप बरीच माहिती जगासमोर यायची आहे. नेताजींबाबतचे पूर्ण सत्य समोर आले आणि ते कादंबरीत केलेल्या वर्णनापेक्षा वेगळे असले, तर कादंबरीचा शेवट बदलला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
...तर कादंबरीचा शेवट बदलावा लागेल!
By admin | Published: October 04, 2015 2:54 AM