ऑनलाइन लोकमत
सातारा, दि.20 - कृष्णा कारखान्यातील बोगस कर्जप्रकरणी तत्कालीन कार्यकारी संचालकांना बुधवारी रात्री उशिरा क-हाड शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. अशोक श्रीरंग नलवडे (रा. मंगळवेढा) असे त्यांचे नाव आहे. अशोक नलवडे हे सध्या मंगळवेढ्यातील दामाजी सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक म्हणून काम पाहत आहेत.
रेठरे बुद्रुक-शिवनगर येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्यात बोगस कर्ज प्रकरणे झाल्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वी उघडकीस आला आहे. कारखान्याच्या ७८४ ऊसतोडणी वाहतूक कंत्राटदारांच्या नावे बोगस स्वाक्षºया करून प्रत्येकी सात लाख रुपयांप्रमाणे ५८ कोटींचे कर्ज काढण्यात आले होते. या कर्जाबाबत ऊसतोडणी वाहतूकदार अनभिज्ञ असतानाच अचानक त्यांना कर्जाची परतफेड करण्यासंदर्भात बँकेकडून नोटीस पाठविण्यात आली. त्यानंतर या प्रकाराचा भांडाफोड झाला. ४ आॅगस्ट २०१६ रोजी तांबवे, ता. वाळवा येथील यशवंत पाटील या वाहतूकदाराने याबाबत कºहाड शहर पोलिसांत फिर्याद दिली. फिर्यादीनुसार तपास सुरू असताना सुरुवातीलाच कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष अविनाश मोहिते व उपाध्यक्ष सुरेश पाटील यांना पोलिसांनी अटक केली. सध्या दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणात काही दिवसांपूर्वी आठ माजी संचालकांनाही पोलिसांनी अटक केली आहे.