लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शेतकरी संपावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. कर्जमाफी, आरक्षण वगैरे प्रत्येक मुद्द्यावर अभ्यास करू, या सरकारी आश्वासनाचाही त्यांनी समाचार घेतला. प्रत्येक विषयावर फक्त अभ्यास करायचा असेल तर त्यांनी शाळेत जायला पाहिजे, सरकार चालवू नये, असा टोला त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. भाजपावर हल्लाबोल करताना ते म्हणाले, शेतकरी कर्जमाफी, बाळासाहेबांचे स्मारक अशी वाट्टेल ती आश्वासने देऊन भाजपा सत्तेवर आली. पण राज्याच्या तिजोरीत पैसेच नसताना ही आश्वासने पूर्ण कशी करणार, असा सवाल करतानाच भाजपाने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला. जुन्या घोषणांना नवीन नाव देण्यासाठी भाजपाकडे एक समिती असल्याची टीकाही त्यांनी केली.शेतकरी संपाला तुमचा पाठिंबा आहे का? असे विचारले असतामाझा पाठिंबा शेतकऱ्यांच्या भावनांना आहे, असे सांगून ते म्हणाले,राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चे निघाले, पण पुढे काय झाले? संप आणि बंद करून काय हाती पडणार हे महत्त्वाचे आहे. जे गिरणी कामगारांचे झाले ते शेतकऱ्यांचे व्हायला नको. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणे महत्त्वाचे असून, तोपर्यंत त्यांच्या मनातील राग कायम राहणे गरजेचे आहे.शिवसेनेवरही साधला निशाणाराज्य सरकारवर टीकेची झोड उठवणाऱ्या राज यांनी शिवसेनेवरही निशाणा साधला. शिवसेना सत्तेत फक्त अंडी उबवत बसली असून, त्यांना भूमिकाच घेता येत नाही. त्यांचे मंत्री खुर्ची सांभाळण्यात व्यस्त आहेत, असे ते म्हणाले.
...मग शाळेत जा!
By admin | Published: June 03, 2017 3:40 AM