ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील मेट्रो 3 प्रकल्पासाठी होणाऱ्या वृक्षतोडीवरील बंदी कायम ठेवत जर उद्या झाडंच राहिली नाही तर दुसऱ्या ग्रहावर स्थलांतरित व्हावं लागेल असं भाष्य केलं आहे. ‘बेसुमार वृक्षतोड होत राहिल्यास आपल्याला दुसऱ्या ग्रहाचा शोध घ्यावा लागेल अशा शब्दात न्यायालयाने वृक्षतोडीवर नाराजी व्यक्त केली.
मेट्रो 3 प्रकल्पासाठी वृक्षतोड केली जाऊ नये यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मेट्रो 3 प्रकल्पासाठी तब्बल 50 हजार झाडे तोडण्यात येणार आहेत. वृक्षतोड केल्याशिवाय मेट्रो 3 प्रकल्पाची उभारणी करणे शक्य नसल्याचे एमएमआरडीएकडून मुंबई उच्च न्यायालयात सांगण्यात आले. त्यावर सुनावणीदरम्यान न्यायालयाने हे मत मांडत वृक्षतोडीवरील बंदी कायम ठेवली.
मुंबईतल्या मेट्रो 3 साठी वृक्षतोडीचा प्रस्ताव आल्यानंतर पालिकेनं नेमकी काय प्रक्रिया केली? वृक्ष तोडीची परवानगी देण्याआधी पालिकेनं सर्व्हे केला होता का? याची माहिती पालिकेनं प्रतिज्ञापत्रावर द्यावी. असे आदेश उच्च न्यायालयानं दिले आहेत.
यावरील पुढील सुनावणी २ आठवड्यांसाठी तहकूब करण्यात आली आहे.