मुंबई: राज्यातलं सरकार पाडण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. आधी आमच्या नेत्यांना लक्ष्य केलं. नंतर माझ्याकडे वळले. पण यंत्रणांना भीक घातली नाही म्हणून ईडीच्या धाडी सुरू झाल्या. काय बघायचं ते बघून घ्या. आम्हीदेखील बघून घेऊ, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला थेट आव्हान दिलं आहे.
ईडीच्या धाडींची माहिती मुलुंडमधल्या दलालाला सर्वात आधी कशी काय मिळते, असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला. ठाकरे कुटुंबानं अलिबागमध्ये कोरलाईत १९ बंगले बांधले आहेत. ती बेनामी संपत्ती असल्याचा दावा मुलुंडमधल्या दलालानं केला आहे. कुठे आहेत १९ बंगले? चला आपण त्या बंगल्यात आपण पिकनिकला जाऊ, असं आव्हान राऊतांनी दिलं.
माझं स्पष्ट आणि थेट आव्हान आहे. आपण चार बसेस करू आणि त्या १९ बंगल्यात पिकनिकला जाऊ. तिथे ठाकरे कुटुंबाचे १९ बंगले दिसले तर मी राजकारण सोडेन आणि बंगले तिथे नसतील तर मी त्याला जोड्यानं मारेन, असं राऊत म्हणाले.
काही वर्षांपूर्वी भाजपचा हाच दलाल मराठी भाषेविरोधात हायकोर्टात गेला होता आणि आता हा आम्हाला सांगतो. याचं थोबाड आधी बंद करा अन्यथा आम्ही बंद करू, असा थेट इशारा राऊतांनी दिला. आम्ही झुकणार नाही. बाळासाहेबांची शिवसेना गुडघे टेकणार नाही. तुम्ही चुकीच्या माणसाशी पंगा घेतला आहे, असं राऊत यांनी सांगितलं.