मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचां आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांना विविध क्षेत्रातून शुभेच्छा देण्यात येत आहेत. दरम्यान, शिवसेनेत बंडखोरी करून वेगळा झालेल्या शिंदे गटाच्या नेत्यांकडूनही उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या गेला. तर शिवसेनेचे कोकणातील बंडखोर नेते असलेल्या रामदास कदम यांनीही उद्धव ठाकरे यांना खोचक भाषेत शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र मी उद्धव ठाकरे यांना माजी मुख्यमंत्री म्हणूनच शुभेच्छा देईन, असे रामदास कदम म्हणाले.
''मी उद्धव ठाकरेंना माजी मुख्यमंत्री म्हणूनच शुभेच्छा देईन, कारण त्यांनी शरद पवारांचं नेतृत्व सोडून बाळासाहेबांच्या विचारांचं नेतृत्व ठेवलं असतं तर त्यांना मी निश्चितपणे शिवसेनेचे प्रमुख म्हटलं असतं. मात्र आज ते बाळासाहेबांचे सुपुत्र म्हणून काम पाहत नाहीत, तर ते शरद पवार यांच्या मांडीवर बसून त्यांच्या विचारांशी सहमत होऊन काम करताहेत. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमाई, बाळासाहेबांच्या पाठीत खंजिर खुपसण्याचं काम, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी ही दुर्दैवाने उद्धव ठाकरेंकडून झाली आहे, अशी खरमरीत टीका रामदास कदम यांनी केली.
सध्या उद्धव ठाकरे महाराष्ट्रात अमूक गद्दार, तमूक हरामखोर ही भाषा वापरत आहेत. ही भाषा वापरण्यापेक्षा स्वत:चं आत्मपरीक्षण करून बघा. कोण गद्दार आहे याचं आत्मपरीक्षण तुम्ही करून बघा. ५१ आमदार का जातात, १२-१४ खासदार का जातात, शेकडो नगरसेवक का जातात, आज माझ्या खेडमधील पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. हकालपट्टीशिवाय दुसरं काम काय सुरू आहे. फक्त शिवसैनिकांना भावनात्मक ब्लॅकमेल करायचं, आवाहन करायचं एवढंच काम सुरू आहे. तीन वर्षांत आमदारांना भेटले असते तर ही वेळ आली नसती, असा टोला रामदास कदम यांनी लगावला.
तुम्ही आजारी होतात, पण आदित्य ठाकरे तर आजारी नव्हते ना. आदित्य ठाकरेंना स्वत:चं खातं राहिलं बाजूला इतरांची खाती पाहायची आहेत.त्यांना आमदारांना भेटायचं नव्हतं, खासदारांना भेटायचं नव्हतं. आज तुमच्या जनसंवाद यात्रा निघताहेत, शिवसेना भवनचे मातोश्रीचे दरवाजे उघडे ठेवले जाताहेत. पण हेच जर तीन वर्षे आधी केलं असतं तर ही वेळ आली नसती, असा चिमटा रामदास कदम यांनी काढला.
तसेच उद्धव ठाकरेंच्या सामनामध्ये झालेल्या मुलाखतीवरही रामदास कदम यांनी टीका केली. ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंची कालची मुलाखत म्हणजे उंदराला मांजर साक्षी. संजय राऊत प्रश्न विचारणार आणि तुम्ही उत्तरं देणार. हे सगळं हास्यास्पद आहे. बरं त्यात नवीन काय होतं. ती गंजलेली तलवार, आईचं दूध, शिवसेना आई होती, बाळासाहेबांची शिवसेना आई होती. बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत, बाळासाहेबांच्या विचारांसोबत गद्दारी कुणी केली, हे तुम्ही सांगा ना. आईच्या दुधाची आठवण तुम्ही ठेवताय, तर मग शिवसेनेची आई बाळासाहेबांचे विचार होते. मग बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी तुम्ही केली. हे बाकीच्यांना ठीक आहे, नवीन शिवसैनिक, तरुण पिढी या भावनिक ब्लॅकमेलमध्ये थोडे अडकतील, पण जुन्या शिवसैनिकांनी अनुभव घेतलाय, असा टोला रामदास कदम यांनी लगावला.