...तर माझ्यावर सुप्रिया सुळेंविरोधात प्रचार करण्याचा प्रसंग आला नसता; अजित पवारांची रोखठोक भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 05:43 PM2024-04-22T17:43:42+5:302024-04-22T17:47:45+5:30
Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'लोकमत डिजिटल'ला दिलेल्या मुलाखतीतून अजित पवार यांनी रोखठोकपणे आपली भूमिका मांडली आहे.
Ajit Pawar Vs Supriya Sule ( Marathi News ) :बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आल्याने पवार कुटुंबात राजकीय संघर्ष सुरू आहे. जे अजित पवार आजपर्यंत सुप्रिया सुळे यांच्या विजयासाठी जीवाचं रान करत होते, तेच या निवडणुकीत सुळे यांच्या पराभवासाठी जंग जंग पछाडत असल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर 'लोकमत डिजिटल'ला दिलेल्या मुलाखतीतून अजित पवार यांनी आपली भूमिका रोखठोकपणे मांडत अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे.
बारामतीत एकाच कुटुंबात दोन उमेदवार मैदानात आहेत, सगळं सुरळीत असतं तर कदाचित बहिणीसाठी आपण आज प्रचार करताना दिसले असता, असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार यांनी पक्षात कशामुळे फूट पडली, याचं कारण सांगितलं आहे. "आम्ही जी राजकीय भूमिका घेतली, त्या भूमिकेसोबत आता जे आमच्या समोर आहेत ते राहिले असते तर हा प्रसंग आला नसता. परंतु त्यांनी वेगळी लाइन घेतली. मी असेल किंवा सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल या सर्वांना असं वाटतं आज देशाच्या विचार करता विकासासाठी आपल्या पक्षाचं स्वतंत्र अस्तित्व ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा द्यायला हवा. जसं याआधी आम्ही काँग्रेसबरोबर राहिलो आहोत, शिवसेनेसोबत राहिलो आहोत, तसं आता नरेंद्र मोदींसोबत जावं, असा आमचा विचार होता. नरेंद्र मोदी विरुद्ध ही राहुल गांधी, अशी ही निवडणूक आहे. ही निवडणूक नणंद विरुद्ध भावजय अशी नाही. ही भावकीची-गावकीची निवडणूक नाही," असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, "निवडणुका म्हटल्यानंतर दोन्ही बाजूचे उमेदवार तुल्यबळ आहेत, असं समजूनच निवडणुकीत उतरायचं असतं. मी आजपर्यंत जेवढ्या निवडणुका लढलो, त्यामध्ये तशी भूमिका ठेवूनच मी निवडणुकीच्या रणांगणात उतरून मी वयाच्या २९ व्या वर्षापासून काम करत आहे," अशा शब्दांत अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
"राजकारणात एवढं परिवर्तन कसं?"
"एकेकाळी तुम्ही शरद पवारांना आपले सर्वेसर्वा मानत होता, मात्र आता त्याच पवारांच्या विरुद्ध जाऊन तुम्ही नरेंद्र मोदी यांची स्तुती करत असता. राजकारणात एवढं परिवर्तन कसं होत असतं?" असा प्रश्नही लोकमत डिजिटलच्या मुलाखतीत अजित पवारांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, "असं काही नाही. आमच्या कुटुंबात एकेकाळी वसंतराव पवार हे उभे असताना अख्खं कुटुंब एका बाजूला होतं आणि पवारसाहेबांनी त्यांच्याविरोधात प्रचार केला, असा अनुभव त्या काळात आमच्या कुटुंबाने घेतला आहे. सगळे एका बाजूला असताना पवारसाहेबांनी दुसरी भूमिका घेऊन वाटचाल केली. मी राजकारणात आल्यानंतर बघितलेलं आहे, १९७८ साली पवारसाहेबांनी जेव्हा पुलोदची स्थापना केली, तेव्हाही वसंतदादा पाटलांच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडून, काँग्रेस पक्षातील आमदार सोबत घेऊन आणि जनता पक्षाच्या १०५ आमदारांसोबत सरकार स्थापन केलं होतं. त्यामुळे आमच्या भागातल्या लोकांनी अशी भूमिका अनेकदा बघितली आहे."
शरद पवारांना बारामतीत सहानुभूती?
बारामतीकरांची सहानुभूती शरद पवारांसोबत असल्याचं दिसत आहे. याबाबत विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार काहीसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. "आम्ही जे केलंय ते आमच्या सदसद्विवेक बुद्धीला स्मरूण केलं आहे. आमच्या वरिष्ठांनीही कॉलेज जीवनापासून अनेकदा वेगळ्या भूमिका घेतल्या आहेत. हे बारामतीकरांना माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे. २०१४ साली भाजपने न मागता त्यांना पाठिंबा दिला. तुमच्या मनात येईल त्या गोष्टी करायच्या. त्यांनीच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं अध्यक्षपदावरून दूर होण्याचा निर्णय घेतला होता. नंतर पुन्हा राजीनामा मागे घेतला. या पण सगळ्या गोष्टी आहेत. मी पण बारामती तालुक्यात कामच केलं आहे ना? लोकांना हे पण विचारा की बारामती तालुक्याच्या विकासात सर्वाधिक योगदान कुणाचं आहे?" असा सवाल अजित पवारांनी केला.