ऑनलाइन लोकमत
डोंबिवली, दि. 3 - महाराष्ट्रामध्ये गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोलकर यांच्यासारख्या हत्या होतात, हे योग्य नाही. मलाही धमक्या आल्या. माझी बायकोही भीती व्यक्त करते. सनातन धर्माच्या व्यक्तींकडून मला धमक्या आल्यानंतर मला संरक्षण देण्यात आले. पण साहित्यिकाला पोलिसांच्या बंदुकीचे संरक्षण मिळावे हे योग्य नाही. या दहशत चा मी निषेध करतो . ज्या देशात म्हाताम्याच्या मारेकऱ्याची मंदिर होतात ते किती योग्य आहे. ब्राह्मण,दलित आपापसात संशयाने बघत आहेत. विद्वानही उजवीकडे डावीकडे विभागले गेले आहेत. मी या सर्वाचा निषेध करत राहीन, मग मला गोळ्या मारल्या तरी चालतील. असा घणाघात मराठी साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी 90 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी केला.
परखड बोलण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या आणि वर्षभर सडेतोड बोलून मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाची कारकीर्द गाजवणाऱ्या सबनीय यांनी अध्यक्षीय कारकीर्दीचा शेवटही तितकाच घणाघाती भाषणाने केला. संयुक्त महाराष्ट्रापासून गांधीहत्येपर्यंत आणि वैचारिक वादापासून साहित्यिकांमधील जातीयवादापर्यंत सर्वाचा त्यांनी घणाघाती समाचार घेतला.
ते म्हणाले, "दाभोलकर , पानसरे मारेकरी अद्याप मोकाट आहेत. इंग्लडच्या तोडीचे आपले पोलीस खाते झोपा काढत आहे. महाराष्ट्राच्या अंतःकरणात आक्रोश आहेत. मलाही सनातन धर्माच्या व्यक्तीकडून धमकी मिळाली आहे. एखाद्या लेखकाला पोलीस संरक्षण मिळावे हे महाराष्ट्राचे दुर्दैव. दहशतीखाली सत्य समोर येत नसते. मी या दहशतीचा निषेध करतो. ब्राह्मणांचा, बहुजनांचा, मराठ्यांचा जातीयवाद यामध्ये महाराष्ट्र जळतोय. संस्कृती दुभंगतेय, समाज दुभंगतोय. मी उजवाही नाही, डावाही नाही. मी या सर्वांचा विरोध करत राहीन, मला गोळ्या घातल्या तरी चालतील."
यावेळी संयुक्त महाराष्ट्राचा मुद्दाही प्रभावीपणे मांडताना सबनीस यांनी वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्यांवर टीकास्त्र सोडले. "बेळगावचा सीमा प्रश्न भिजत पडला आहे. तिथे मराठी माणूस यातना भोगतोय. कन्नड अत्याचार प्रचंड वाढलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे. बृहन्महाराष्ट्रातील संस्थांना मदत करणे हे शासनाचे आद्यकर्तव्य आहे. विदर्भाचा बॅकलॉग अपूर्ण आहे. त्यातून स्वतंत्र विदर्भाची मागणी होतेय. पण महाराष्ट्र खंडित झाला तर तो हुतात्म्यांचा अपमान असेल. विदर्भावरील अन्याय दूर करण्याचा कार्यक्रम आखणे गरजेचे आहे. तुमच्या पक्षाचे धोरण कोणतेही असो. महाराष्ट्राचा सांस्कृतिक नकाशा फुटलेला चालणार नाही," असे सबनीस यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना सुनावले.
"बहुजनांचा विद्वानांचा जातीयवाद हानिकारक आहे. ब्राह्मणांचा इतिहास पक्षपाती असेल तर ब्राह्मणेतर इतिहासही पक्षपाती आहे. दोन्ही विकृतींचा निषेध करतो. माणूस म्हणून जोडणारे सत्य हवे. म्हणून आज मी अक्षयकुमार काळे यांना सूत्राऐवजी सत्य प्रदान करतो,"असे सांगत सबनीस यांना साहित्य संमेलनाची सूत्रे काळे यांच्या कडे सोपवली.