राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा करताच राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. अजित पवारांनी माध्यमांना प्रतिक्रिया देणे टाळले आणि न बोलताच ते तिथून निघाले. दिल्लीत कार्यक्रम झाल्याने अजित पवार कार्यक्रम संपल्या संपल्या कुठे गेले असा प्रश्न चर्चिला जात असातानाच राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
राष्ट्रवादीच्या आजच्या २५ व्या वर्धापनदिनावेळी शरद पवारांनी मोठी घोषणा केली आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष केले आहे. ही घोषणा पवारांनी अजित पवार व्यासपीठावर असतानाच केली आहे. या कार्यक्रमाला सुप्रिया सुळे अनुपस्थित होत्या. अजित पवार उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हा राष्ट्रवादीची धुरा अजित पवार की सुप्रिया सुळेंकडे सोपविणार असा प्रश्न उपस्थित झाला होता. यानंतर पवारांनी राजीनामा मागे घेतला होता. परंतू, भविष्यात हा प्रश्न येणार होता. यामुळे पवारांनी कार्यकारी अध्यक्षपदांची घोषणा करून याची सोय केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
असे असताना वंदना चव्हाण यांनी या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळेंना कार्यकारी अध्यक्ष नेमल्याचा आनंद आहे. प्रफुल्ल पटेल वरिष्ठ नेते होतेच. राष्ट्रवादीने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावला आहे तो पुन्हा आणायचा आहे. या दृष्टीने नक्कीच महत्वाचा आणि चांगला निर्णय आहे, असे त्या म्हणाल्या.
पक्षाचे नेतृत्व सुप्रिया सुळेंकडे किंवा अजित पवारांकडे या गोष्टींचा आम्ही विचारसुद्धा करत नाही. जेव्हा शरद पवारांनी राजीनामा दिलेला तेव्हा त्यांनी मागे घेतला नाही किंवा ऐकलेच नाही तर काय, तेव्हा अजित पवारांनीच सुप्रियांना कार्यकारी अध्यक्ष बनवावे असा प्रस्ताव दिला होता, असा खुलासा चव्हाण यांनी केला आहे.