"...तेव्हा जितेंद्र आव्हाड फडणवीसांच्या पाया पडले"; मुश्रिफांनी भाषणात सांगितला किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2023 08:46 PM2023-08-27T20:46:47+5:302023-08-27T20:51:59+5:30
कोल्हापूरच्या सगळ्या उस्तादांना भेटायला एक वस्ताद आलाय, त्या वस्तादाचं नाव शरदचंद्र पवार साहेब, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी नाव न घेता मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली होती.
मुंबई/बीड - कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रस पक्षाची निर्धार सभा पार पडली. या सभेला खासदार शरद पवारांनी संबोधित केलं. या सभेतून शरद पवार यांनी अजित पवार गटावर थेट निशाणा साधला. तर, सभेत बोलत आमदार जितेंद्र आव्हाडांनीअजित पवार गटावर टीका करताना त्यांना गद्दार असं संबोधलं. तसेच, हसन मुश्रीफ यांच्यावरही हल्लाबोल केला होता. त्या सभेपासून आव्हाड आणि मुश्रीफ यांच्यात चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही नेत्यांमधील शाब्दीक चकमक पायतानापर्यंत येऊन पोहोचली होती. मात्र, बीडमधील सभेतून हसन मुश्रीफ यांनी मोठा गौप्यस्फोट केला.
कोल्हापूरच्या सगळ्या उस्तादांना भेटायला एक वस्ताद आलाय, त्या वस्तादाचं नाव शरदचंद्र पवार साहेब, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी नाव न घेता मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली होती. तसेच, काहींच्या रक्तातच गद्दारी असते असा घणाघातही त्यांनी नाव न घेता अजित पवार गटावर केला होता. जे साप बिळात होते, ते बाहेर पडले आहेत. या सापांना चेचण्यासाठी आपल्याला पायतानाचा वापर करावा लागेल. कोल्हापुरात पायतान प्रसिद्घ आहे. त्याचा उपयोग महाराष्ट्राने करावा, असा टोलाही आव्हाडांनी लगावला होता. या टीकेनंतर हसन मुश्रीफ यांनी आव्हाडांवर पलटवार केला. कोल्हापूरच्या कपाशीचं पायताना बसल्यावर त्याला कळेल, असे म्हटले. त्यानंतर, आता पुन्हा एकदा आव्हाड यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
बीडमधील सभेत जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करताना हसन मुश्रीफ यांनी गौप्यस्फोटच केला. यावेळी, जयंत पाटील यांनी ही घटना मला सांगितल्याचा संदर्भही मुश्रीफ यांनी दिला. एकनाथ शिंदे गुवाहटीला गेल्यानंतर भाजपासोबत जाण्यासाठी राष्ट्रवादीच्या ५३ आमदारांनी पत्रावर सह्या केल्या होत्या, तेव्हा आव्हाड यांनी कशी सही केली? असा प्रश्न मुश्रीफ यांनी बीडमधील सभेतून विचारला. तसेच, मला तर थक्क करणारी एक घटना जयंत पाटील यांनी सांगितली. ठाण्यामध्ये एकदा जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल झाल्यावर अजित दादा विरोधी पक्षनेते होते, तेव्हा अजित दादांना आणि जयंत पाटलांना घेऊन ते अध्यक्षांच्या दालनात गेले होते. तेथे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते. त्यावेळी, ते देवेंद्र फडणवीसांच्या पाया पडले आणि म्हणाले की मी आता विधानसभेची निवडणूक लढवणार नाही. मला विधानपरिषदेवर दादांनी पाठवावं, असा गौप्यस्फोटच हसन मुश्रीफ यांनी बीडमधील सभेत केला. तसेच, असा भेकड माणूस व्यासपीठावरुन काहीही बोलतो आणि साहेब त्याचं ऐकतात हे आश्चर्यं वाटतं, असेही मुश्रीफ यांनी म्हटलं.
चप्पल बसली की कळेल
जितेंद्र आव्हाड मला फार ज्युनियर आहेत. त्यांनी पवार साहेबांवर काय जादू केली, मला माहित नाही. त्यांनी ठाण्यात पक्ष संपविण्याचं काम केलं. अजित पवार आणि आमच्याविषयी त्यांनी असं बोलायला नको. आम्ही सत्तेत जाण्यासाठी शरद पवारांना पत्र दिलं होतं. त्यात ५३ स्वाक्षऱ्या होत्या. त्यात त्यांचीही स्वाक्षरी होती. तेव्हा कुठं गेला होता तुझा धर्म असा सवाल करत मुश्रीफ म्हणाले, कोल्हापुरात चप्पल प्रसिद्ध नाही, कापशीची चप्पल प्रसिद्ध आहे. ती बसली की त्यांना कळेल, अशा जशास तसा टोला मुश्रीफ यांनी लगावला होता. त्यानंतर, पुन्हा ट्विट करुन आव्हाड यांनी हसन मुश्रीफ अस्वस्थ झाल्याचं म्हटलं आहे.