नागपूर : महापरीक्षा पोर्टलद्वारे विविध सरकारी पदांची भरती करण्यात येते. मात्र, या पोर्टलद्वारे राबविण्यात येणारी प्रक्रिया सदोष असल्याचा आरोप परीक्षार्थीकडून झाला व राष्ट्रवादीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी हे पोर्टल बंद करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. परंतु संबंधित पोर्टलमध्ये त्रुटी असल्या तरी त्या दूर करण्यात येतील. तंत्रज्ञान नवीन आहे व ते सुरळीत होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी बुधवारी विधान परिषदेत केले. त्रयस्थ संस्थेमार्फत या ‘पोर्टल’चे तांत्रिक परीक्षण करण्यात येत आहे. याच्या अहवालाच्या आधारे आवश्यक असेल तर महा ई परीक्षा प्रणालीत आवश्यक ते बदल करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
सतीश चव्हाण यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली. सरकारी नोकरभरतीत पारदर्शकता यावी, सर्व प्रक्रिया आॅनलाईन व्हावी म्हणून महापरीक्षा पोर्टल सुरू करण्यात आले. मात्र, भरतीअंतर्गत परीक्षेचा गोंधळ, चुकीची प्रश्नपत्रिका, सदोष निकाल, उत्तरतालिकांतील त्रुटी, अनुपस्थित उमेदवाराचे अंतिम गुणवत्ता यादीत नाव यामुळे परीक्षार्थींनी ‘पोर्टल’वर हरकती घेतल्या असल्याची भूमिका चव्हाण यांनी मांडली. यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी आपली बाजू स्पष्ट केली. राज्यात सर्व प्रशासकीय विभागांतील क व ड गटाच्या पदभरतीसाठी आॅनलाईन पद्धतीने महापरीक्षा पोर्टलद्वारे परीक्षा घेण्यात येतात व ‘महाआयटी’तर्फे याचे आयोजन करण्यात येते. या ‘पोर्टल’द्वारे ज्या विभागांच्या परीक्षा घेण्यात येतात, त्याच्या प्रश्नपत्रिका तज्ज्ञांकडून तयार होतात. सॉफ्टवेअरमधील सोयीमुळे प्रश्नांची पुनरावृत्ती होत नाही. अंतिम निवड यादीत घोळ होत नाही.
केवळ एकदाच नजरचुकीने उमेदवाराचा ‘कोड’ चुकीचा लिहिला गेल्यामुळे जालना जिल्ह्यातील तलाठी प्रवर्गाच्या परीक्षेस गैरहजर राहिलेल्या उमेदवाराचे नाव अंतिम यादीत आले होते. परीक्षा केंद्र निवडण्याचेदेखील परीक्षार्थींना पर्याय असतात. पशुसंवर्धन विभागाच्या परीक्षेसाठी चार लाखांहून अधिक उमेदवारांची नोंदणी झाली होती.
इतक्या जणांची परीक्षा घेण्याची ‘पोर्टल’ची क्षमता नाही. त्यामुळे या भरती प्रक्रियेस तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे, असेदेखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले.