मुंबई - महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच लोकसभा निकालाचा आणखी जास्त परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण या निवडणुकीत मोदी फॅक्टर कमी होईल. २-५ टक्के मते कमी होतील. जर महाविकास आघाडी एकत्रित लढत असेल आणि उद्धव ठाकरेंचं नेतृत्व स्वीकारलं जात असेल तर स्पष्टपणे बहुमत महाविकास आघाडीला मिळू शकते अशी भविष्यवाणी राजकीय रणनीतीकार योगेंद्र यादव यांनी केली आहे.
योगेंद्र यादव म्हणाले की, ज्याप्रकारे शिवसेना, राष्ट्रवादी फुटली आणि मागील दरवाजानं सरकार बनवलं गेले, त्यामुळे लोक नाराज होते. एकनाथ शिंदेंची शिवसेना संपेल असा माझा अंदाज होता. परंतु ते चुकीचे ठरले. मात्र कोणती शिवसेना, कोणती राष्ट्रवादी खरी हे निकालातून दिसून आले. ज्यांना निवडणूक आयोगाने चिन्ह दिले ते खोटे आणि ज्यांना नाही दिले ते खरे आहेत हे सिद्ध झालं असं त्यांनी सांगितले. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
तसेच लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांनी यंदा जे काही केले ते लोकांना आवडले नाही. संविधानाचा प्रश्न असताना राजकीय जे खेळ केले ते लोकांना आवडले नाहीत. जर विधानसभेला त्यांची वंचित मविआसोबत आले तर महायुती सत्तेत येण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र नाही आले तरीही मविआ महाराष्ट्राच्या विधानसभेत पुढे आहे असं योगेंद्र यादव यांनी म्हटलं.
दरम्यान, निवडणुकीआधी काही ठिकाणी इंडिया आघाडीत ताळमेळ दिसला नाही. जागावाटप शेवटपर्यंत रखडले होते. पश्चिम बंगालमध्ये ते पाहिले. जर विरोधकांनी एकत्र सामोरे गेले असते तर २६५ ते २७५ जागा निवडून आल्या असत्या. मात्र विरोधकांनी ही संधी गमावली. पण लढायला संधी मिळाली आहे. आता ठीक करा. पुढील ६ महिन्यात काय होईल ते कुणी सांगू शकत नाही. विरोधकांनी जे काही करायचे ते कायदेशीर करावं असं यादवांनी सांगितले.
काँग्रेसला मोठी भूमिका निभवावी लागेल
भाजपा आणि आरएसएससोबत केवळ निवडणुकीची लढाई नाही तर ही संस्कृती आणि विचारांची लढाई आहे. विरोधकांच्या अनेक नेत्यांशी बोलतो तेव्हा त्यातील निम्मे भाजपाची भाषा बोलतात. ते बदलावं लागेल. प्रादेशिक पक्षांनी हा देश एकत्र ठेवला आहे. भाजपाचा मुकाबला करण्यासाठी तुम्हाला राष्ट्रीय पक्ष हवाच. त्यासाठी येणाऱ्या काळात काँग्रेसला मोठी भूमिका निभवावी लागेल. राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेचा परिणाम या निकालात झाला असंही योगेंद्र यादव यांनी सांगितले.