पिंपळगावला पंतप्रधान नरेंद्र मोदींची दहा तारखेला प्रचंड मोठी जाहीर सभा होणार आहे. त्यावेळी लक्षात येईल नाशिक जिल्ह्यातून किती खासदार जातील. नाशिक, दिंडोरी यासह धुळे या सर्वच भागात आम्ही महायुती म्हणून प्रचारात ताकतीने उतरणार आहोत, असे मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.
दिंडोरी लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार भारती पवार या भुजबळांच्या भेटीला आल्या होत्या. यावेळी भुजबळांनी मोदी यांनी शरद पवारांवर केलेल्या भटकत्या आत्म्याच्या टीकेवरही प्रतिक्रिया दिली. शरद पवार जर मोदींवर टीका करत आहेत तर मोदी पण त्यांच्यावर टीका करणारच, ज्यांना ज्यांना जे जे मुद्दे मिळतात त्यावर ते बोलणार, असे भुजबळ म्हणाले.
आमच्याकडे खूप चांगले चांगले उमेदवार असल्याने चांगल्यातला चांगला निवडणे कठीण जात आहे. उशीर होतोय मात्र काळजी करण्याचे कारण नाही, असे भुजबळ यांनी नाशिक उमेदवारीवर स्पष्ट केले. मी सुद्धा एक महिना थांबून चातकासारखे तिकिटाकडे डोळे लावून बघणे बरोबर नाही. मतदार आणि कार्यकर्ते सगळे मजबुतीने तयारीत आहोत, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.
एक लाख टन कांदा निर्यातीसाठी आता परवानगी मिळाली आहे, कदाचित आणखीन मिळेल. दोन तारखेला भारती पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत तोपर्यंत नाशिक लोकसभा मतदारसंघात देखील महायुतीचा उमेदवार जाहीर होईल. या दोन्ही मतदारसंघात आम्ही पूर्ण शक्तीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाणार आहोत, असे भुजबळ म्हणाले.