मुंबईः देशात कोरोना व्हायरसनं अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत या रोगानं तीन जणांचा मृत्यू झाला असून, 148हून अधिक जण कोरोनाबाधित आहेत. त्यानंतर आता राज्य सरकारनंही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचे पाऊल उचललं आहे. राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 42 झाल्याचीही माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मुंबईतल्या वाढत्या गर्दीवर मुख्यमंत्र्यांनी आपले विचार स्पष्ट केले आहेत. आम्ही परिस्थितीचं निरीक्षण करत आहोत. सगळ्या खासगी क्षेत्रातील कंपन्यांना, उद्योजकांना वर्क फ्रॉम होम किंवा गरज पडल्यास कार्यालयात 50 टक्क्यांपेक्षा कमी लोकांमध्ये काम करा, असं सांगितलेलं आहे. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे.जर मुंबईच्या जनतेनं आमचं ऐकलं नाही, तर मुंबईची लाइफलाइन असलेली ट्रेन आणि बस सुविधा 10 ते 12 दिवसांसाठी जनतेच्या हितार्थ बंद करावी लागेल. त्यादृष्टीनंही लक्ष ठेवून आहोत, असंही आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी स्पष्ट केलं आहे. सध्याची परिस्थिती ठीक आहे. कोणाचीही एकदम गंभीर स्थिती नाही. स्क्रीनिंग आणि टेस्टिंगमध्ये 42 संशयित रुग्णांचे वगळता बाकीचे सगळे निगेटिव्ह आलेले आहेत.काही लोकांची चाचणी होणं अजून बाकी आहे. चाचणी वाढवण्याचं काम आपण मोठ्या पद्धतीनं करतो आहोत. नवी मेडिकल कॉलेजमध्ये ज्या लॅब सुरू करायच्या आहेत. औरंगाबाद, धुळे, सांगली, कोल्हापूर त्या ठिकाणी लॅब सुरू करायच्या आहेत. सरकारची परवानगी आणि एनआयव्हीचं व्हेलिडेशन लवकर कसं मिळेल, यासाठी स्वतः प्रयत्न करणार आहे.
प्रवासाचा इतिहास आणि लक्षणं आढळल्यावरच कोरोनाची तपासणी करण्यात येणार आहे. या दोन अटींच्या पूर्ततेनंतरच टेस्ट केल्या जातात. सर्दी, खोकला झाला म्हणून लगेचच चाचणी करण्यात येणार नाही. कोरोनाची लक्षणं असलेल्या लोकांच्याच चाचण्या केल्या पाहिजेत, हे नियमावली सांगते. सामाजिक दृष्टिकोनातून जे कोणी संशयित किंवा कोरोना पॉझिटिव्ह आढळत असतील, त्याबाबत दुजाभाव होता कामा नये. त्यांच्याबाबत माणुसकीला धरून नसलेली वर्तणूक करणं हे निषेधार्ह आहे. या आजारानं घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नाही. सोसायटीतल्या लोकांनी अशा रुग्णांना मदत केली पाहिजे.