पुणे - राज्यातील अनेक तरूणांना व्यसनांपासून राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी वाचवले. मात्र आबांना स्वत:ला झालेल्या कॅन्सरची लक्षणे योग्य वेळी कळालीच नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यास उशिर झाला. योग्य वेळी माहिती कळाली असती तर आबा वाचले असते, असे मत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. तसेच तरूणांना व्यसनांपासून दूर राहण्याचे त्यांनी या वेळी आवाहन केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण मुंबई व पुणे जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. आर. आर. पाटील (आबा) कॅन्सर साक्षर व कॅन्सर मुक्त अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वानवडी येथील कार्यक्रमात करण्यात आला.
अजित पवार म्हणाले, की निर्व्यसनी लोकांना कॅन्सर होतो. सध्या पिके घेताना मोठ्या प्रमाणात किटकनाशके वापरतात. त्यामुळे निर्व्यसनी नागरिकांना कॅन्सर होतो. मंत्रालायात आल्यावर माणसांना नैराश्य येतात. मंत्रालयात माणसं आयुष्य संपवतात. चुकीच्या पध्दतीचा मार्ग नागरिकांनी अवलबंू नये. आत्महत्या करू नये. कॅन्सरची जनजागृती व साक्षरता मोठ्या प्रमाणात करण्याची गरज आहे. जिल्हा परिषद प्रमाणे पुणे आणि पिंपरी-चिचवड मध्ये हे अभियान राबविण्याची गरज आहे.
याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, महिला व बाल कल्याण समिती सभापती राणी शेळके, समाज कल्याण सभापती सुरेखा चौरे, पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर प्रशांत जगताप, जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार, राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, महिला अध्यक्षा वैशाली नागवडे, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश डोके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने उपस्थित होते.
सध्याच्या तरूणी बिनधास्त व्यसनं करतात....
अनेकदा जाहिर सभांमधून आर. आर. पाटील यांना तंबाखू खाऊ नका, असे आवाहन केले होते. मात्र ते तंबाखू सोडू शकले नाही. व्यसनामुळे अनेक कुटुंब उदधवस्त झाल्याचे मी पाहिले आहे. पुणे आणि मुंबईमध्ये हुक्का पार्लरची संस्कृती निर्माण होत आहे. हल्ली तरूण मुली मोठ्या प्रमाणात सिगारेट अथवा इतर व्यसन करत असल्याचे चित्र आहे. तंबाखू सारख्या व्यसनामुळे कॅन्सरचा धोका असतो. वैद्यकिय संशोधनामुळे कॅन्सर पहिल्या टप्प्यामध्ये बरा होत आहे. मात्र त्यासाठी काळजी घेणे आवश्यक असून, प्राथमिक लक्षण समजणे महत्त्वाचे आहे. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर कॅन्सरवर मात केली. पण सगळ्याकडे अशी इच्छाशक्ती नसते, असे अजित पवार या वेळी म्हणाले.