अमरावती : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जात आहे. यावर आता महायुतीच्या नेत्यांनी प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. ईव्हीएमवर आक्षेप घेत असेल तर अमरावतीच्या खासदारांनी देखील राजीनामा द्यावा आणि आमदार रवी राणा हे देखील राजीनामा देतील. यानंतर होऊन जाऊ द्या, एकदा बॅलेट पेपरवर निवडणूक, असे आव्हान माजी खासदार नवनीत राणा यांनी काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे यांना दिलं आहे.
राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. या निवडणुकीत महायुतीने 235 जागांवर विजय मिळवला. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला केवळ 50 पेक्षाही कमी जागावर समाधान मानावे लागले. या निकालानंतर महाविकास आघाडीकडून ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचे सांगत आक्षेप घेतला जात आहे. यावर नवनीत राणा यांनी बळवंत वानखेडे यांच्यावर टीका करत खासदारकीचा राजीनामा देण्याचे आव्हान केले आहे. तसेच, लोकसभा निवडणुकीवेळी ईव्हीएम चांगले होते. आता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ते लगेच वाईट झाले का, असा सवाल नवनीत राणा यांनी विचारला.
नवनीत राणा म्हणाल्या की, मला महाविकास आघाडीची कमाल वाटते. लोकसभा निवडणुकीत त्यांना जास्त जागा आल्या, तेव्हा ईव्हीएम बरोबर होतं, तेव्हा लोकशाही जिवंत होती. आम्ही संविधानाला मानणारे लोक आहोत आणि एकदा निकाल आल्यानंतर त्याबद्दल आक्षेप घेण्यासाठी आम्ही कोणीही त्यावेळी बाहेर निघालो नाही. पण आता इतकंच असेल तर अमरावतीच्या खासदारांनी राजीनामा द्यावा. आमचे बडनेराचे आमदार रवी राणादेखील राजीनामा देतील. मग होऊ जाऊ दे, एकदाच बॅलेट पेपरवर निवडणूक, असे म्हणत नवनीत राणा यांनी खासदार बळवंत वानखेडे यांना आव्हान दिले आहे.
दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत अमरावतीत नवनीत राणा यांचा पराभव झाला होता. काँग्रेसच्या बळवंत वानखडे यांनी नवनीत राणा यांचा १९ हजार ७३१ मतांनी पराभव केला. या पराभवामुळे नवनीत राणा यांना मोठा धक्का बसला. अमरावती लोकसभा मतदारसंघात विधानसभेचे ६ मतदारसंघ येतात. त्यापैकी ४ मतदारसंघात बळवंत वानखडे यांनी आघाडी घेतली. तर नवनीत राणा केवळ २ मतदारसंघात पुढे होत्या. यातील एका मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व नवनीत राणांचे पती रवी राणा करतात.