धुळे : शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या आणि पूर्वीच्या कर्जाचे पुनर्गठण करण्यासाठी सहकार्य न करणाऱ्या बँकांविरुद्ध गुन्हे (एफआयआर) दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथील आढावा बैठकीत दिले. खरीप पीककर्जात अडचणी येत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने रविवारी प्रसिद्ध केले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी टंचाई, पीक कर्ज स्थिती, रोहयो व जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांचा आढावा घेतला. पीक कर्जाच्या अडचणीस जबाबदार अधिकाऱ्यांनाही त्यांनी धारेवर धरले. पीक कर्ज व मागील कर्ज पुनर्गठणाची समस्या त्यांच्या लक्षात आली. हंगाम सुरू होऊनही अद्याप शेतकऱ्यांना कर्ज मिळू शकले नसल्याची बाब हेरून मुख्यमंत्र्यांनी सहकार्य न करणाऱ्या बँकांविरुद्ध गुन्हे नोंदवण्याचे आदेश बजावले. धुळे-नंदुरबार बँकेसंदर्भात मला निवेदन प्राप्त झाले आहे. याप्रश्नी मी वैयक्तिक लक्ष घालून विषय मार्गी लावणार असल्याचे ते म्हणाले. महापालिकेच्या अनुदानासह विविध प्रश्न व मागण्यांबाबत स्वतंत्र बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. नवीन पीक कर्जांबाबत नार्बाडने हात आखडता घेतल्याने राज्यातील बळीराजा संकटात सापडला आहे.कर्ज पुनर्गठण करताना राज्य सरकारचा १५ टक्के हिस्सा गेल्या १५ वर्षापासून थकीत असल्याने नाबार्डने नव्या कर्जांबाबत कठोर निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ऐन पेरणीच्या तोंडावर शेतक-यांना मिळणारे पीककर्ज संकटात आली आहेत.मुुख्यमंत्र्यांनी सकाळी शिंदखेडा तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांची पाहणी केली. शिंदखेडा तालुक्यातील शेवाडे येथे वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या मेंढपाळांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दीड लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. (प्रतिनिधी)शिंदखेडयाचे आमदार जयुकमार रावल यांना मंत्रिपदासाठी कोणाच्या शिफारशीची आवश्यकता नाही. त्यांचे कामच त्यांच्या कार्यक्षमतेची पावती देते. योग्यवेळी आपणास चांगली वार्ता कानी पडेल, - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
...तर बँकांवर गुन्हे नोंदवा
By admin | Published: June 16, 2015 3:04 AM