...तर १९९६ मध्ये शरद पवार देशाचे पंतप्रधान झाले असते; प्रफुल पटेल यांचा मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 09:12 PM2023-06-16T21:12:57+5:302023-06-16T21:13:31+5:30

मला एका गोष्टीची खंत वाटते. शरद पवारांनीही ती खंत असेल अशी भावना राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी व्यक्त केली.

...then Sharad Pawar would have become the Prime Minister of the country in 1996; Big secret explosion of NCP Praful Patel | ...तर १९९६ मध्ये शरद पवार देशाचे पंतप्रधान झाले असते; प्रफुल पटेल यांचा मोठा गौप्यस्फोट

...तर १९९६ मध्ये शरद पवार देशाचे पंतप्रधान झाले असते; प्रफुल पटेल यांचा मोठा गौप्यस्फोट

googlenewsNext

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि देशाचे माजी कृषीमंत्री असलेले शरद पवार यांच्याबाबत पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी गौप्यस्फोट केला आहे. १९९६ साली जर शरद पवारांनी ठोस भूमिका घेतली असती तर देशाला मराठी पंतप्रधान मिळाला असता असा दावा पटेल यांनी केला. त्यामुळे पुन्हा एकदा शरद पवार आणि पंतप्रधानपद याबाबत राजकीय चर्चेला उधाण आले आहे. 

प्रफुल पटेल म्हणाले की, मला एका गोष्टीची खंत वाटते. शरद पवारांनीही ती खंत असेल. १९९६ साली देवेगौडा यांचा पाठिंबा काँग्रेसकडून केसरींनी काढून घेतला. त्यावेळी काँग्रेस पक्षात जे वातावरण होते त्यात १०१ टक्के लोक शरद पवारांच्या पाठिशी उभे होते आणि त्यावेळी शरद पवारांनी ठाम राहून निर्णय घेतला असता तर देवेगौडा यांच्यानंतर आर.के गुजराल नव्हे तर शरद पवारच देशाचे पंतप्रधान झाले असते असं त्यांनी सांगितले. 

तसेच त्यावेळी आम्ही कुठेतरी कमी पडलो. केसरी यांनी लोकसभा निवडणुका होऊन अवघ्या अकराव्या महिन्यानंतर देवेगौडा यांचा पाठिंबा काढून घेतला. तेव्हा काँग्रेसची परिस्थितीही फार काही चांगली नव्हती. काँग्रेसचे १४५ खासदार होते आणि शरद पवार हे पक्षाचे संसदीय नेते होते. पाठिंबा काढून घेतल्यानंतर पुढे निवडणुका लागतील अशी परिस्थिती होती. कोणत्या खासदारांना ११ महिन्यानंतर निवडणुका परत हव्या होत्या? अचानक तुम्ही निवडणुकांना सामोरे गेले तर काय तुमची परिस्थिती राहणार आहे अशी भीती खासदारांना होती. निवडून येणार की नाही, पक्ष निवडून येणार की नाही असे बरेच प्रश्न होते. सीताराम केसरी यांनी कुठलाही विचार न करता स्वत:च्या मर्जीने सरकारचा पाठिंबा काढून घेतला. कदाचित मी स्वत: पंतप्रधान होईल असं केसरींना वाटले असावे असंही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी सांगितले. 

शरद पवार हे राष्ट्रीय राजकारणात आल्यापासून त्यांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न जगजाहीर आहे. अनेकदा पंतप्रधानपदाची नावे पुढे आली तर त्यात शरद पवार हे नाव नक्कीच चर्चेत असते. काँग्रेस काळातही शरद पवार हे आघाडीचे नेते होते. देशात त्यांचे राजकीय वजन होते. परंतु कालांतराने सोनिया गांधी यांच्या विदेशी मुद्द्यावरून शरद पवारांनी काँग्रेसपासून वेगळी चूल मांडत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. राष्ट्रवादी काँग्रेसची पकड महाराष्ट्रात मजबूत असली तरी इतर राज्यात राष्ट्रवादीला म्हणावं तेवढं वर्चस्व स्थापन करता आले नाही. त्यामुळे अद्यापही शरद पवारांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही. 
 
 

Web Title: ...then Sharad Pawar would have become the Prime Minister of the country in 1996; Big secret explosion of NCP Praful Patel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.