लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : श्रीमंत लोक कोरोनाची लस पैसे देऊन घेऊ शकतात, पण गरिबांना ती मोफत द्यावी, अशी मागणी आपण ७ जानेवारी रोजीच्या बैठकीत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे करणार आहोत. केंद्राने गरिबांसाठी लस मोफत दिली नाही, तर राज्य सरकार ती मोफत देण्याचा विचार करेल, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी येथे पत्रकारांना सांगितले.
टोपे म्हणाले, ७ तारखेला केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याशी माझी व्हीसीद्वारे बैठक आहे. गरिबांना लस मोफत द्या, अशी मागणी करणारे पत्र राज्याकडून केंद्राला पाठविले जाईल. गरिबांसाठी ५०० रुपयांचा खर्चही अधिक आहे. त्यांना मोफतच लस मिळाली पाहिजे. ८ तारखेला लसीकरणाची ड्राय रन सर्व जिल्ह्यांमध्ये होईल, अशी माहितीही टोपे यांनी दिली.
राज्यात सध्या रुग्णवाढीचा दर बराच कमी झाला आहे. दोन हजारांच्या घरात रुग्ण वाढत आहेत. मृत्युदरही कमी झाला आहे. ९६ टक्के रुग्ण बरे होत आहेत. ब्रिटन स्ट्रेनचे आठ रुग्ण आढळले. ते विलगीकरणात आहेत. ते ज्यांच्या संपर्कात आले होते त्यांचाही शोध घेतला जात आहे. सजग राहणे आवश्यक आहे.
लस व त्यांची परिणामकारकता यावर दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत, याकडे लक्ष वेधले असता टोपे म्हणाले, ७ तारखेच्या बैठकीत हा मुद्दा मी उपस्थित करणार असून लसीबाबत लोकांच्या मनात शंका असू नये, ही भूमिका मांडेन.
संचारबंदीचा निर्णय चर्चेनंतरच घेणारमुंबईतील लोकल सुरू करणे व रात्रीची संचारबंदी हटविण्याचा कुठलाही निर्णय अद्याप झालेला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे याबाबत लवकरच आढावा घेतील व त्यानंतरच निर्णय होईल, असे टोपे यांनी स्पष्ट केले.