"....तर आमदारांचे, मोठ्या अधिकाऱ्यांचे पगार थांबवा"; रोहित पवारांची महायुती सरकारकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 11:44 IST2025-04-11T11:41:19+5:302025-04-11T11:44:38+5:30

एसटी कर्मचारी पगार: राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मुद्दा तापला आहे. पुरेसे पैसे नसल्याने कर्मचाऱ्यांना एकूण पगारापैकी ५६ टक्केच रक्कम दिली गेली.

"...then stop the salaries of MLAs and senior officials"; Rohit Pawar's demand to the grand alliance government | "....तर आमदारांचे, मोठ्या अधिकाऱ्यांचे पगार थांबवा"; रोहित पवारांची महायुती सरकारकडे मागणी

"....तर आमदारांचे, मोठ्या अधिकाऱ्यांचे पगार थांबवा"; रोहित पवारांची महायुती सरकारकडे मागणी

ST Karmachari Pagar: परिवहन महामंडळाकडे निधी नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा ५६ टक्केच पगार दिला गेला. हा प्रकार समोर आल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटना संतप्त झाल्या. त्यामुळे राज्य सरकारने हस्तक्षेप करत उर्वरित ४४ टक्के पगार मंगळवारपर्यंत करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यावरूनच आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

राज्य सरकारकडून एसटी प्रवासासाठी वेगवेगळ्या सवलत योजना जाहीर करण्यात आलेल्या आहेत. या योजनांचे प्रतिपूर्तीचे पैसे राज्य सरकारकडून राज्य परिवहन महामंडळाला दिले जातात. पण, राज्य सरकारकडून सगळे पैसे दिले न गेल्याने एसटी कर्मचाऱ्यांचा मार्च महिन्याचा ५६ टक्केच पगार करण्यात आला. 

वाचा >एसटी कर्मचाऱ्यांचे जगायचे वांदे! आधीच उशिरा वेतन, या महिन्यात तर अर्धाच पगार हातावर

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या मुद्द्यावरून आमदार रोहित पवारांनी सरकारकडे मोठी मागणी केली आहे.  "एसटी कर्मचाऱ्यांना पगार देण्याऐवजी फक्त वल्गना करण्यातच हे सरकार धन्यता मानताना दिसत आहे. या महिन्याची १० तारीख आली, तरी पगार होत नाहीत. या महिन्यात तर केवळ ५५ टक्के पगार म्हणजे २०,००० पगार असेल तर केवळ ११,००० पगार झाला. एसटी कर्मचाऱ्यांनी निम्म्या पगारात घर चालवायचं तरी कसं?", असा सवाल करत "अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री यावर बोलतील, ही अपेक्षा", असे रोहित पवार म्हणाले. 

रोहित पवारांनी पुढे म्हटले आहे की, "सरकारकडे एसटीला द्यायला पैसे नसतील तर आमदारांचे, मोठ्या अधिकाऱ्यांचे पगार थांबवा, पण एसटी कर्मचाऱ्यांचे पगार आधी करा, ही विनंती!", अशी मागणी त्यांनी महायुती सरकारकडे केली आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांना निम्माच पगार का दिला गेला?

राज्य परिवहन महामंडळाला एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे लागतात. राज्य सरकारकडून गेल्या महिन्याच्या प्रतिपूर्तीपोटीची रक्कम २७२ कोटी ९६ लाख रुपये दिले गेले. त्यातील ४० कोटी महामंडळाने एसटी बँकेकडे वर्ग केले, तर काही रक्कम कर्मचारी पीएफसाठी दिली गेली. त्यामुळे पगारासाठी १३५ कोटी रुपयेच उरले होते. 

राज्याचे परिवहन मंत्री आणि राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनीही अर्थ खात्याकडून प्रतिपूर्तीचे पैसे वेळेवर मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली होती. प्रवासी वाढले आहेत, पण सरकारकडून पैसे वेळेवर दिले जात नाही आणि यासंदर्भात अजित पवारांना विनंती करणार असल्याचे ते म्हणाले आहेत. 

Web Title: "...then stop the salaries of MLAs and senior officials"; Rohit Pawar's demand to the grand alliance government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.