लाडकी बहीण योजनेप्रमाणे अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांचे लाडके मंत्री झाले आहेत. ज्या जागेवर हा कार्यक्रम होत आहे, ती जागा पठाण नावाच्या महिलेची आहे. ती जागा सत्तार यांनी बळकावली आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. तसेच ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळेला गोल्ड मेडल मिळाले असले असाही दावा दानवे यांनी केला आहे.
महाराष्ट्राच्या तरुणाने ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवले त्याला मुख्यमंत्र्यांनी बक्षीस दिले आहे. मात्र, जाताना त्याला साहित्य देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यावेळी साहित्य दिले असते तर आज कांस्य ऐवजी सुवर्ण पदक मिळाले असते. आता पदक मिळाल्यावर त्याचे कौतुक करत आहेत, अशी टीका दानवेंनी केली.
अब्दुल सत्तार आज छ. संभाजीनगरमध्ये लाडकी बहीण योजनेला सुरुवात करत आहेत. याचे आश्चर्य वाटतेय. अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांचा उल्लेख कसा केला होता, हे दुर्दैवी आहे. सत्तार ठाकरे सरकार मध्ये होते तेव्हा त्यांनी एका शेतात हनुमानाबद्दल काय शिवीगाळ केली होती. ती क्लिप भाजपानेच बाहेर आणली होती. सत्तार हिंदुत्वाविरुद्ध गरळ ओकत आहेत. कालच त्यांनी इम्तियाज जलील यांची भेट घेतली. आम्ही साधे हात जरी मिळविले तरी हे लोक आम्हाला हिंदुत्व शिकवत बसतात, अशी टीका दानवे यांनी शिवसेना आणि भाजपवर केली आहे.
राज्यात रस्त्यावर खड्डे पडले, रुग्णालयात औषधे नाहीत. असे असताना २७२ कोटी जाहिरातीवर खर्च केले जातात. भाजपने एक जाहिरात लावली होती कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र, असाच सवाल आता उपस्थित होत आहे. एकीकडे दीड हजार द्यायचे दुसरीकडे ६५ हजार कोटींचे कर्ज करायचे आहे, अशी टीकाही दानवे यांनी केली.