ऑनलाइन लोकमत
बेळगाव, दि. 25- बेळगावचे जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी मराठी वृत्तपत्रांवर कारवाई करण्याचं वक्तव्य केलं आहे. मराठी वृत्तपत्रांमुळे सीमाभागातील वातावरण खराब होत असल्याचा आरोप करत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चातील मागण्यांचे निवेदन घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. "वितरण वाढविण्यासाठी मराठी वृत्तपत्रांकडून मराठी आणि कन्नड भाषिकांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या बातम्या प्रसिध्द केल्या जात आहेत. समाजाच्या दृष्टीने ते चुकीचे असून मराठी प्रसार माध्यमांनी वास्तव मांडावे. अन्यथा वृत्तपत्रांवर कारवाई करावी लागेल". असं वक्तव्य जिल्हाधिकारी एन.जयराम यांनी केलं आहे.
माणसांच्या हक्काच्या लढ्यात मराठी वृत्तपत्रांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. सरकार, प्रशासनाकडून होणाऱ्या प्रत्येक अन्यायाला वाचा फोडली आहे. त्यामुळेच जिल्हाधिकारी एन. जयराम यांचा मराठीद्वेष उफाळून आला आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. सीमाप्रश्नाच्या लढ्याला चालना देण्याचे काम मराठी वृत्तपत्रांतून होत असल्यामुळे प्रशासनाकडून कारवाईची भाषा बोलली जाते आहे, असंही बोललं जातं आहे.
एकीकरण समितीच्या मोर्चात जय महाराष्ट्राचा गजर करण्यात आला. जिल्हाधिकारी निवेदन स्वीकारण्यास येतानाही जय महाराष्ट्रच्या घोषणा देण्यात आल्या. त्यावेळी कन्नड पत्रकारांनी जिल्हाधिकाऱ्यांना जय महाराष्ट्र म्हणणाऱ्यांवर कारवाई करणार का, असा प्रश्न विचारला. त्यावर पोलिसांनी कोणत्या अटींवर मोर्चाला परवानगी दिली होती. त्या अटींचे उल्लंघन झालं का, याची तपासणी करून गुन्हे दाखल करण्यात येतील, असं जिल्हाधिकारी जयराम यांनी सांगितले.