Sharad Pawar ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यातील मतदानापूर्वी प्रचारतोफा थंडावल्या असल्या तरी राजकीय नेत्यांकडून दावे-प्रतिवादे सुरूच आहेत. २००४ साली काँग्रेसपेक्षा आमचे जास्त आमदार निवडून आल्यानंतर छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री केलं असतं तर आमचा पक्ष फुटला असता, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकताच एका मुलाखतीदरम्यान केला. पवार यांच्या या दाव्यावर आता छगन भुजबळ यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे.
"तेव्हा अजित पवार हे नवखे होते, हे बरोबर आहे. मी आधीपासून पवार साहेबांसोबत होतो. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसपेक्षा आमच्या जागा जास्त निवडून आल्यानंतर काँग्रेस पक्ष आम्हाला मुख्यमंत्रिपद द्यायला तयार होता. मात्र पवारसाहेबांनीच मुख्यमंत्रिपद घेण्यास नकार दिल्याचं नंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून आम्हाला सांगण्यात आलं. परंतु मला मुख्यमंत्रिपद दिलं असतं तर पक्ष फुटला असता, असं ते का म्हणाले हे मला माहीत नाही," अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी आपली भूमिका मांडली आहे.
गौप्यस्फोट करताना शरद पवार नक्की काय म्हणाले?
२००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला असता पण पक्ष नेतृत्वाने ते पद काँग्रेसला दिले, असा आरोप अजित पवार यांनी केला होता. या आरोपाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले, " २००४ मध्ये मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय फार विचारपूर्वक घेण्यात आला होता. तेव्हा अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सोपविण्याचा प्रश्न नव्हता. कारण ते फारच नवखे होते. मुख्यमंत्रिपदासाठी कोणी योग्य नेता आमच्याकडे नव्हता. तेव्हा छगन भुजबळ यांच्याकडे मुख्यमंत्रिपद दिले असते तर भविष्यात पक्षात फूट पडली असती.त्यामुळे अधिकची मंत्रिपदे आणि खाती मिळवून मुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे कायम ठेवण्याचा निर्णयावर आम्ही आलो," असं शरद पवारांनी म्हटलं आहे.