...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 05:55 PM2024-05-04T17:55:30+5:302024-05-04T17:56:07+5:30

तटकरे म्हणाले, "संजय राऊतांनी सुरुवात केली की, उद्धवजी दिल्लीवरून आल्यापासून या मन:स्थितीत आले आहेत की, आपण महाविकास आघाडीचे सरकार पाडूयात. राजीनामा देऊयात, बाहेर पडूयात आणि भाजपसोबत सरकार स्थापन करूया..."

then Uddhav Thackeray offered to form Shiv Sena NCP BJP government Secret explosion of sunil tatkare | ...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट

...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट

संपूर्ण राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्ष आपापल्या उमेदवारांचा कंबर कसून प्रचार करत आहेत. दरम्यान, नेते मंडळी एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप आणि दावे-प्रतिदावे करतानाही दिसत आहेत. यातून, आजपर्यंत जनतेच्या समोर न आलेल्या अनेक गोपनीय गोष्टी, घटना, घडामोडी समोर येत आहेत. नेते मंडळींकडून अशा अनेक घटनांचे खुलासे, दावे आणि गौप्यस्फोट होत आहेत. यातच आज लोकमतसोबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात एक मोठा गोप्यस्फोट केला आहे. लोकमत डिजिटल मीडियाचे संपादक आशिष जाधव यांनी त्यांची मुलाखत घेतली.

यावेळी, उद्धव ठाकरे फॅक्टर चालतोय, असे रिपोर्ट आहेत. तुमची काय भूमिका आहे? कारण काल-परवा पंतप्रधान नरेंद्र मोदी एका मुलाखती म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना जेव्हा-जेव्हा मदत लागेल तेव्हा मी धावून जाईल, मी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत होतो. एक विंडो भाजपने उद्धव ठाकरेंसमोर ओपन केली अशी चर्चा आहे. यावर बोलताना तटकरे यांनी मोठा गोप्यस्फोट केला. ते म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या संदर्भात वक्तव्य केले हे मला माहीत नाही आणि राज्याचे मुख्यमत्री म्हणून उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री म्हणून अजित दादा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण, हे पंतप्रधान मोदी यांची भेट घेण्यासाठी गेले होते. तिघांची एकत्रित चर्चा झाल्यानंतर, हे दोघेही बाहेर आले आणि पंतप्रधान-उद्धवजी यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली. या चर्चेनंतर, उद्धवजी मुंबईला आल्यानंतर, सात-आठ दिवसांनी संजय राऊतांचा मला फोन आला की, कीही करून मला अजित दादांना भेटायचे आहे. एक दिवस अजित दादांनी वेळ दिली होती. मात्र ती होऊ शकली नाही. संजय राऊत नाराज झाले. मी पुन्हा दादांची समजूत घातली. यानंतर, मुंबईच्याच एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ती बैठक झाली. त्यावेळी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि मिलिंद नार्वेकरही तेथे होते."

तटकरे पुढे म्हणाले, "संजय राऊतांनी सुरुवात केली की, उद्धवजी दिल्लीवरून आल्यापासून या मन:स्थितीत आले आहेत की, आपण महाविकास आघाडीचे सरकार पाडूयात. राजीनामा देऊयात, बाहेर पडूयात आणि भाजपसोबत सरकार स्थापन करूया. उद्धवजींनी संजय राउतासोबत तीन-चार वेळा चर्चा केली, असं संजय राऊत सांगत आले. मग त्यांनी प्रश्न विचारला शिंदे साहेबांना की मी जे सांगतोय, ते म्हणाले होय, मलाही तसंच म्हणाले, असं उत्तर शिंदेंनी दिलं. मिलिंद नार्वेकरांनीही त्याला दुजोरा दिला... अशी एकंदरित चर्चा होती. पण मग असं ठरलं की, आज महाविकास आघाडी बनलेली आहे, ती आपण टिकवली पाहीजे, वैगेरे वैगेरे..."

"माझ्या सांगण्याचा मतितार्थ असा की, ज्या अर्थी पंतप्रधान महोदय असं म्हणतात, मला माहित नाही, त्या म्हणण्याचा संदर्भात नेमका काय आहे? पण उद्धव ठाकरेंच्या मनात त्यावेळेला भाजप बद्दल ज्या भावना होत्या, त्या स्पष्ट होत्या, ज्या मला संजय राऊतांनी सांगितल्या. विद्यमान मुख्यमंत्री आणि मिलिंद नार्वेकर यांनी त्यावर शिक्कामोर्तब केलं," असेही तटकरे म्हणाले. 

...ते प्रेम पुन्हा कधी उचंबळून येईल, सांगता येणार नाही -
यावर, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की, उद्या परवा उद्धव ठाकरे पुन्हा भाजपकडे जाऊ शकतात, म्हणजेच महायुतीकडे येऊ शकतात? यावर बोलताना तटकरे म्हणाले, "महाविकास आघाडी सरकार बनण्यासाठी ज्या पद्धतीने प्रचंड मेहनत पवार साहेबांनी घेतली, सोनिया गांधी यांची परवानगी मिळवण्यासाठी त्यांनी जे राजकीय कौशल्य पणाला लावलं, ते एका भेटीत कसं विरघळलं, हे मला कळत नही. त्यामुळे ते प्रेम पुन्हा कधी उचंबळून येईल, या बद्दल मला फारसं सांगता येणार नाही." खरे तर, "ही (भाजप - शिवसेना) दीर्घ काळाची एनडीएची युती आहे. अटल बिहारी वाजपेयी, आडवाणी, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी तयार केलेली राष्ट्रीय लोकशाही आघाडी आहे. प्रकाश सिंद बादल यांचेही यात मोठे योगदान होते. त्यामुळे आता जुन्या आठवणी, जुने प्रेम...," असेही तटकरे म्हणाले. 
 

Web Title: then Uddhav Thackeray offered to form Shiv Sena NCP BJP government Secret explosion of sunil tatkare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.