ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ : जर शिवसेना आमचे साहित्य जाळत असेल तर शिवसेनेनं सुद्धा त्यांच्या प्रकाशनांच्या जाळपोळीसाठी तयार राहावं असा इशारा भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी दिला आहे. त्यामुळे शिवसेना भाजप मध्ये सुरू असलेल्या वादात आणखी भर पडणाची शक्यता आहे.आज मुंबईत पंतप्रधानांच्या मन की बात हा कार्यक्रम जनतेसोबत ऐकण्यासाठी मन की बात, चाय के साथ या कार्यक्रमाचं आयोजन भाजपाकडून करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना आशिष शेलारांनी शिवसेनेवर निशाणा साधला. विकासाच्या प्रवाहाबाहेर राहणार्याना जनता लोकशाही बाहेर ठेवेल असं म्हणत पुण्यातील स्मार्ट सिटी योजनेच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार्या शिवसेनेला टोला सुद्धा शेलारांनी लगावला.भाजपचे नेते माधव भांडारी यांनी मनोगत या पाक्षिकामध्ये लिहिलेल्या लेखात उद्धव ठाकरे यांना असरानी अशी उपमा दिली होती. त्यामुळे सेना आणि भाजपमध्ये शोले राडा भडकला होता. सेनेनंही आपल्या स्टाईलमध्ये जोरदार पलटवार करत अमित शहांना गब्बर, माधव भांडारींनी सांबा अशी उपमा देऊन प्रतिहल्ला चढवला होता.एवढंच नाहीतर माधव भांडारींची शिवसैनिकांनी पुतळा जाळला होता. यावर तोडगा म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी युद्धबंदीची घोषणा केली होती. यापुढे कुणीही एकमेकांवर टीका करणार नाही असं दानवेंनी जाहीर केलं. पण आता आशिष शेलारांनी जशाच तसे उत्तर देण्याची इशारा देऊन वाद मिटणार नाही असं स्पष्ट केलं.