...तर मग पुण्यात आलेच कशाला? कोल्हापुरलाच थांबायचं होतं ना! अजित पवारांचा पाटलांना चिमटा
By दीपक अविनाश कुलकर्णी | Published: December 26, 2020 12:25 PM2020-12-26T12:25:19+5:302020-12-26T13:58:18+5:30
पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस हे मी पुन्हा येईन, पुन्हा येईन असे म्हणत होते. आता ते दुसरे त्यांचे सहकारी म्हणतात, मी परत जाईन, परत जाईन...
पुणे : एक वर्ष होण्याआधीच ते कोल्हापूरला परत जाण्याची वक्तव्य करू लागले आहे. कोथरूडकरांनी त्यांना पूर्ण पाच वर्षांकरिता निवडून दिले आहे. या कालावधीत कोथरुडचे प्रश्न मार्गी लागावेत. आणि विकास व्हावा हीच आमची अपेक्षा आहे. उद्या नागरिक त्यांच्याकडे आपले काम घेऊन गेले तर ते म्हणायचे मी कोल्हापूरला परत जाणार आहे. पण मग परत जायचंच होतं तर पुण्यात आलेच कशाला? कोल्हापुरलाच थांबायचं होतं ना... अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांवर चिमटा काढला आहे.
पुण्यातील विधानभवन येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले,पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस हे मी पुन्हा येईन, पुन्हा येईन असे म्हणत होते. आता ते दुसरे त्यांचे सहकारी म्हणतात, मी परत जाईन, परत जाईन. पण त्यांना कुणी पुणेकरांनी पुण्यात या असे बोलावलंच नव्हतं ना. पण एक झालं ते म्हणजे त्यांच्या पुण्यात येण्याने आमच्या भगिनी मेधा कुलकर्णी व त्यांच्या कार्यकर्ते कारण नसताना नाराज झाले.
पुण्यात अटल गौरव पुरस्कार सोहळ्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 'पुणे सगळ्यांना आपलेसे करून घेते, प्रत्येकाला इथे सेटल व्हावे असे वाटते', असा उल्लेख करत 'देवेंद्रजी, मी कोल्हापूरला परत जाणार आहे, माझ्या विरोधकांनाही सांगून टाका', असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात काही दिवस तरी जोरदार चर्चा झाल्याशिवाय राहणार नाही. आता या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे.
चंद्रकांत पाटलांनी त्यांचं काम करत राहावे आम्ही आमचे करत राहू. आम्ही त्यांना अजिबात त्रास देणार नाही. पण केंद्र सरकारने जर शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत असे ते सांगतात तर आज तो रस्त्यावर का उतरला आहे. दिल्लीत कडाक्याच्या थंडीत देखील तिथे आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन का सुरु आहे याचं आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. पुण्यात येऊन फडणवीसांनी फक्त बैलगाडीत फोटो काढले. पण बैलगाडीत फोटो काढण्यापेक्षा फडणवीसांनी दिल्लीत जाऊन गोठणार्या थंडीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी बोलावं असा जोरदार टोला लगावला.तसेच दिल्लीच्या आंदोलनात महाराष्ट्रातून देखील अनेक शेतकरी सहभागी झाले आहे हे देखील यावेळी पवारांनी स्पष्ट केले.