नाशिक : विरोधकांचे मनोबल खचले असून, हातातून सत्ता जाणार असल्यानेच अनेकांना युतीत प्रवेश करावा लागत आहे. युतीमध्ये मतभेद नाहीच, परंतु जागावाटपात अडचणी आल्याच तर इन्-कमिंग झालेल्यांना रिपाइंच्या कोट्यातून उमेदवारी देऊ, अशी तयारी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी दर्शविली आहे.
विधानसभा निवडणुकीत रिपाइं भाजपासोबतच राहणार आहे. मात्र, शिवसेनाही जोडीला हवीच, असे सांगताना त्यांनी जागा वाटपात युतीत कोणतेही मतभेद नाही. परंतु युती तुटली आणि भाजपाने स्वतंत्र निवडणूक लढविली तरी भाजपाला १७० जागा मिळतील असे भाकीतही आठवले यांनी केले. इन्-कमिंगमुळे युतीतील जागा वाटपात वाद होण्याची शक्यता फेटाळून लावताना इन्-कमिंगमधील उमेदवार सक्षम असतील तर त्यांना रिपाइंच्या कोट्यातूनदेखील उमेदवारी दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीचा फॅक्टर चालला असला तरी आता या निवडणुकीत वंचित आघाडीला फायदा होणार नसून ही आघाडी वंचितच राहणार, असे सांगून आठवले यांनी राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशबाबत सुरू असलेल्या चर्चांवर बोलताना ते शिवसेनेत आलेच तर फायदाच होईल, असे सांगितले. ‘निवडणूक आली म्हणून राजकीय पक्ष काढताहेत यात्रा; मात्र, चालणार फक्त भाजपा-सेना-आरपीआयची मात्रा!’ अशा काव्यपंक्तिही त्यांनी ऐकवल्या.