औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना जबाबदार धरून सरकारवर ३०२ चे गुन्हे दाखल केले पाहिजेत, असा आग्रह धरणारे देवेंद्र फडणवीस हे आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत. रोज शेतकरी आत्महत्या करीत आहेत. मग सरकार स्वत:वर ३०२ चे गुन्हे दाखल करणार का, असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सोमवारी येथे केला. माणिकराव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी मराठवाडा दुष्काळी बैठकीत व नंतर पत्रकारांशी बोलताना राज्य सरकारवर टीका केली. राज्य सरकार गोंधळले आहे. शेतकऱ्यांप्रती सरकार संवेदनशून्य आहे, असा घणाघाती आरोपही या दोघांनी केला. येथील तापडिया नाट्यमंदिरात मराठवाडा दुष्काळी बैठक झाली. येत्या २०-२१ जानेवारीपर्यंत जर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेज व शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला नाही, तर काँग्रेस आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा ठाकरे यांनी दिला. (प्रतिनिधी)
‘...तर मग सरकार स्वत:वर गुन्हे दाखल करून घेणार का?’
By admin | Published: January 06, 2015 2:10 AM