बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर नमो महारोजगार मेळावा पार पडणार आहे. यामुळे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह तिन्ही पक्षांची नेते मंडळी एकवटणार आहेत. अशातच शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी बारामतीमध्ये लोकसभेचे काम करणार नाही अशी घोषणा करून युतीत बंडाची तलवार उपसली आहे.
विधानसभेच्या जागा ठरविल्याशिवाय लोकसभेचे काम करणार नाही, नेत्यांनी सांगितले तरी देखील कोणी काम करणार नाही, असा इशारा शिवतारे यांनी दिला आहे. शिवसेना-भाजपा- राष्ट्रवादीमध्ये सध्या जागावाटपावरून रस्सीखेच सुरु आहे. तिन्ही पक्षांचे नेते आपलाच दावा असल्याचे सांगत आहेत. शिवतारे हे पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातून येतात.
मी सध्या सबुरीची भुमिका घेतली असल्याचे शिवतारे यांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केले. विधानसभेच्या भूमिका स्पष्ट झाल्याशिवाय लोकसभेबाबत निर्णय नाही. विधानसभेच्या भूमिका आज-उद्या स्पष्ट होईल. ज्या दिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याबाबतीत स्पष्ट करतील, तेव्हा निश्चितपणे यातून मार्ग निघेल, असेही शिवतारे म्हणाले आहेत.
तेव्हाची परिस्थीती वेगळी होती. आमचे पक्ष वेगवेगळे होते. राजकीय विरोधक होतो. आता परिस्थिती बदलली आहे. एकमेकांच्या पसंतीचे विचार केला नाही, कामे केली नाही तर नेत्यांनी सांगितले तरी लोक ऐकतील अशी परिस्थिती नाही. यामुळे विधानसभेची खात्री देणार असाल तरच लोकसभेसाठी काम करू, अशी सर्वच मतदारसंघांमध्ये प्रत्येकाची भूमिका असल्याचे शिवतारे यांनी सांगितले.