मुंबई : राज्यातल्या १७ जिल्ह्यांमध्ये ४५ प्रकारची मूलभूत औषधेच नाहीत, अशी धक्कादायक माहिती शुक्रवारी समोर आली. सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, विभागाच्या सचिव सुजाता सौनिक, नव्याने नियुक्त झालेले आयुक्त डॉ. प्रदीप व्यास यांच्यासह राज्यातील अधिकारी यांची एक बैठक मंत्रालयात पार पडली. त्या बैठकीत ही माहिती समोर आली. एकीकडे आरोग्य विभाग दरकरारावर औषधे खरेदी करण्यास तयार नाही, दुसरीकडे संख्या करारात झालेल्या घोटाळ्यांमुळे सरकारची बदनामी होत आहे आणि तिसरीकडे राज्यातील अनेक जिल्हा रुग्णालयांमध्ये औषधे नाहीत, असे चित्र समोर आले आहे. २९७ कोटींची औषध खरेदी आणि त्यांच्या वितरणातील अनियमिततेत ज्या अधिकाऱ्यांचा हात असल्याचा संशय आहे, अशा अधिकाऱ्यांना औषधांची खरेदी, पुरवठा आणि निविदा प्रक्रिया इत्यादी संबंधित कामांपासून सरकारने दूर ठेवणे अपेक्षित आहे. तसेच त्यांचा रेकॉर्डशी संबंध येणार नाही, याचीही सरकारने खात्री करावी, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आपल्या आदेशात नमूद केले होते. भगवान सहाय यांनीदेखील या खरेदीचा वरिष्ठ अधिकारी म्हणून विभागाच्या सचिव सुजाता सौनिक यांचा संबंध याच्याशी येतो की नाही, असे प्रश्न उपस्थित केले होते. सौनिक या खरेदी समितीच्या अध्यक्षही होत्या. त्यामुळे त्यांच्याबद्दल सरकार आता कोणता निर्णय घेणार असे विचारता तपासून घेऊ, असे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. (विशेष प्रतिनिधी)
१७ जिल्ह्यांत ४५ प्रकारची औषधेच नाहीत!
By admin | Published: October 29, 2016 2:08 AM