‘इंडिया’त पंतप्रधानपदासाठी अनेक सक्षम उमेदवार, भाजपाकडेच चेहरा नाही, नाना पटोलेंचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 04:40 PM2023-08-28T16:40:25+5:302023-08-28T16:48:09+5:30
INDIA Opposition Alliance : इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल यावर आघाडी निर्णय घेईल पण काँग्रेसचा एक कार्यकर्ता म्हणून राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत ही आमची भावना आहे
मुंबई - भाजपाच्या अत्याचारी सरकारविरोधात देशभरातील विविध राजकीय पक्षांनी इंडिया आघाडीच्या नावाखाली एक वज्रमुठ बांधलेली आहे. इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर अशी दोन दिवस होणार आहे. ३१ ऑगस्टला इंडिया आघाडीच्या लोगोचे अनावरण केले जाईल. महात्मा गांधी यांनी ब्रिटिश सत्तेला मुंबईतूनच ‘चलो जाव’ चा नारा दिला होता, मोदी सरकारलासुद्धा मुंबईतील बैठकीतूनच ‘चले जाव’चा नारा दिला जाईल, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
गांधी भवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना नाना पटोले म्हणाले की, मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला आगळंवेगळं महत्व आहे. एनडीएमधील काही पक्षही इंडिया आघाडीत सहभागी होऊ शकतात. या बैठकीला नितिशकुमार, ममता बॅनर्जी, केजरीवाल यांच्यासह ६ मुख्यमंत्री, विविध पक्षांचे अध्यक्ष, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, खा. सोनिया गांधी, खा. राहुल गांधी हे उपस्थित असतील. इंडिया आघाडीमध्ये पंतप्रधानपदासाठी अनेक सक्षम उमेदवार आहेत, भाजपाकडेच या पदासाठी उमेदवार नाही. नरेंद्र मोदींना जनता कंटाळली आहे, त्यांची लोकप्रियता झपाट्याने घसरत आहे. इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल यावर आघाडी निर्णय घेईल पण काँग्रेसचा एक कार्यकर्ता म्हणून राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत ही आमची भावना आहे.
एका प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांच्याबरोबर काही सहकारी भाजपाशी हातमिळवून सत्तेत सहभागी झाले ते ते ईडीच्या धाकाने, विकासासाठी नाही, हे शरद पवार यांनीच स्पष्ट केले आहे. हेच लोक मागील अनेक वर्षांपासून सत्तेत होते मग त्यांनी काय विकास केला ते सांगावे.